शैक्षणिक साहित्य केव्हा? आरटीई विद्याथी, पालकांचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 01:15 AM2019-08-14T01:15:24+5:302019-08-14T01:15:59+5:30
भिवंडीतील अनेक शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिना उलटून गेला तरी अद्यापही शैक्षणिक साहित्य दिले नसल्याची बाब समोर आली आहे .
भिवंडी : भिवंडीतील अनेक शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिना उलटून गेला तरी अद्यापही शैक्षणिक साहित्य दिले नसल्याची बाब समोर आली आहे . त्यामुळे तालुक्यातील अनेक आरटीई विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. पंचायत समिती शिक्षण विभाग फक्त कागदी घोडे नाचवून आरटीई अंतर्गत संबंधित शाळांवर नोटीस व कारवाई केल्याची बतावणी करत आहे. शैक्षणिक साहित्य पुरवले नसल्याने पालकांमध्ये संताप पसरला असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
भिवंडीतील आॅल सेंट हायस्कूल, प्रेसिडेन्सी स्कूल, संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल, बेनिझर इंग्लिश स्कूल यांच्यासह आणखी इतरही शाळांमध्ये तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आरटीई कायद्याअंतर्गत प्रवेश घेतला असून या विद्यार्थ्यांना शाळेने शैक्षणिक साहित्यापासून अजूनही वंचित ठेवले आहे. आधी फी भरा मगच साहित्य मिळेल असा फतवा या शाळांनी काढला असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे . तर संबंधित शाळांना व पंचायत समितीच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन सादर करून व चकरा मारूनही आरटीई प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. आपल्याला न्याय मिळावा यासाठी पालकांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मात्र या आंदोलनानंतरही आरटीई विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळणार की नाही याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आम्ही अनेकवेळा निवेदन व विनंती अर्ज पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र गट शिक्षणाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असून केवळ नोटीस पाठवली असल्याची माहिती देतात. मात्र शिक्षण विभागाच्या नोटीस नंतरही आरटीई शाळा अजूनही शैक्षणिक साहित्य का पुरवत नाही.
- श्रीकांत भोईर, कार्यकर्ते
आमच्याकडे आलेल्या तक्र ारीनुसार संबंधित शाळांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले नसेल तर जिल्हा शिक्षण अधिकाºयांकडे त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठीचा अहवाल पाठवण्यात येईल.
- माधव पाटील, गट शिक्षणाधिकारी
आरटीई अंतर्गत प्रवेश घेतल्यानंतर ज्युनियर आणि सिनियर केजीपर्यंत शाळेने सर्व शैक्षणिक साहित्य दिले होते. मात्र आता पहिलीसाठी शाळेने फक्त पुस्तके दिली आहेत. मात्र गणवेश व इतर आवश्यक साहित्य दिले नाही.
- गजानन देवकाते, पालक