संमेलन कधी? कुठे? तुम्हाला काय सांगू?
By admin | Published: January 12, 2017 07:17 AM2017-01-12T07:17:32+5:302017-01-12T07:17:32+5:30
मालवणी महोत्सवातील काव्य संमेलनाप्रमाणे नाट्यसंमेलनालाही ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करावी.
ठाणे : मालवणी महोत्सवातील काव्य संमेलनाप्रमाणे नाट्यसंमेलनालाही ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करावी. म्हणजे मी संमेलनाध्यक्ष झाल्याने गर्दी वाढली, असा लोकांचा समज तरी होईल आणि मलाही बरे वाटेल, अशी खुसखुशीत टिप्पणी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केली.
नाट्यसंमेलनाला सर्व रसिकांनी सगळ्यांनी जरुर यावे. उस्मानाबाद येथे आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संमेलन आहे, असे मी ऐकतोय. मी संमेलनाध्यक्ष असूनही मलाच ते कधी, कुठे होणार ते माहित नाही; तर तुम्हाला काय सांगू, असे वक्तव्यही त्यांनी केले.
शिवाईनगर, उन्नती गार्ड येथे कोकण ग्रामविकास मंडळाने आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवात सोमवारी सावरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ठाण्यात रहायला आल्यावर आणि त्यातही गेल्या सहा महिन्यात माझे अनेक सत्कार झाले. ठाणे मला सर्वार्थाने लाभले. म्हणजे गेल्या ७२ वर्षात मला गिरगावात जो आॅक्सिजन मिळाला नाही, तो एका वर्षात ठाण्यात मिळाला; इतके मोकळेपण ठाण्यात आहे. पण या आकर्षणामुळे ठाण्याचाही आता गिरगाव होतो की काय अशी भीती वाटू लागली आहे, असे मतही त्यांनी मांडले. यावेळी प्रमुख पाहुणे कवी अशोक बागवे यांनीही मनोगत व्यक्त केले. आयोजक सीताराम राणे, कवयित्री शंकुतला चौधरी, संतोष राणे आदी या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान धनश्री क्षीरसागर, तनुजा ढेरे, डॉ. प्रतिभा भिडे, दामोदर घाणेकर, मिलिंद पाटील, विनंती म्हात्रे, ज्योती गोडबोले, विनय होडे, कल्पना सुळे, दया घोंघे, यांना यंदाचा यमुनाबाई राणे साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविले. (प्रतिनिधी)