रखडलेल्या विकासकामांना मुहूर्त कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:24 AM2020-04-25T00:24:58+5:302020-04-25T00:25:43+5:30
डोंबिवलीतील स्थिती; रस्ते, गटारे, मलवाहिन्यांची कामे अर्धवट स्थितीत
डोंबिवली : सध्या लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या रेल्वे सेवेचा फायदा उठवित कल्याण-डोंबिवली शहरातील रखडलेली रेल्वे उड्डाणपुलांची कामे रेल्वे आणि केडीएमसीने सुरू केली आहेत. परंतु, कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी मलवाहिनी, रस्ते काँक्रिटीकरण, गटार आणि छोट्या नाल्यांच्या बांधणीची ठप्प झालेली कामे मात्र सुरू झालेली नाहीत. येऊ घातलेला पावसाळा पाहता ही महत्त्वाची कामे तातडीने होणे गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.
मागील पावसाळ्यात खड्ड्यांनी बेजार केले होते. परंतु, पुढे हिवाळा व आता उन्हाळ्यातही खोदकामांची परंपरा सुरूच होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याची कामे सुरू होती. तर काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची कामे चालू होती. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कामांना कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या ही कामे पूर्णपणे बंद आहेत. हे चित्र घरडा सर्कल ते खंबाळपाडा चौक, कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रोडवर पहायला मिळते. ही कामे अर्धवट स्थितीत बंद पडल्याने आजही काही रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने चालविली जात आहेत.
सध्या मलवाहिनीच्या कामांबरोबर काँक्रिटीकरणाची कामेही बंद आहेत. अर्धवट राहिलेली ही कामे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. एमआयडीसीकडून निवासी भागात नवीन जलवाहिन्या टाकण्याची आणि गटार, छोटे नाले बांधण्याची कामे सुरू होती. दोन ते अडीच फूट व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम निवासी भागातील सर्व्हीस रोडवर सुरू होते. परंतु, ते कामही आता पूर्णपणे बंद आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये रेल्वे आणि केडीएमसीने कोपर आणि पत्रीपुलाचे काम सुरू केले आहे.
तर एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीनेही कल्याण-शीळ मार्गावर विकासकामांना सुरुवात केली आहे. याप्रमाणेच केडीएमसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रखडलेल्या कामांना प्राधान्य दिले गेले पाहिजे अन्यथा अर्धवट राहिलेल्या कामांमुळे पावसाळ्यात खड्डेमय स्थिती राहण्याबरोबरच तसेच पाणी तुंबण्याची समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.
तातडीच्या कामांना प्राधान्य : महत्त्वाची आणि अत्यंत गरजेची असलेली उड्डाणपुलांची कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. तेथे काम करणाऱ्या कामगारांना नियमांचे पालन करायला सांगितले आहे. वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणीही होत आहे. बाकीच्या कामांचा ३ मेनंतर विचार केला जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियमही पाळणे गरजेचे आहे. - सपना कोळी-देवनपल्ली, शहर अभियंता केडीएमसी