यादीत नावे शोधताना झाली दमछाक
By admin | Published: February 22, 2017 06:11 AM2017-02-22T06:11:31+5:302017-02-22T06:11:31+5:30
महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनाचा अभाव मंगळवारी प्रकर्षाने जाणवला
ठाणे : महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनाचा अभाव मंगळवारी प्रकर्षाने जाणवला. मतदार यादीत नाव शोधण्यात बहुतांश मतदारांचे श्रम आणि वेळेचा नाहक अपव्यय झाला. परिणामी संतापलेल्या मतदारांच्या रोषाचा सामना मतदान केंद्रांवरील निवडणूक कर्मचाऱ्यांना करावा लागला.
ठाण्यातील ब्रम्हांड, वसंत विहार, लोकपुरम, हिरानंदानी इस्टेट यासारख्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सकाळी पहिल्या एक तासात मतदानाचे प्रमाण कमी होते. हळुहळू ते वाढत गेले. मतदार यादीतील घोळामुळे या भागातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची प्रचंड गैरसोय झाली. महापालिकेने आॅनलाईन प्रसिद्ध केलेली मतदार यादी आणि केंद्रांवर लावलेल्या यादीत तफावत आढळली. यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी घेऊन मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र या समस्येचे समाधान ते करु शकले नाहीत. त्यामुळे वादविवादाचे प्रकारही घडले. मतदान केंद्रांजवळ मतदार स्लीप वाटण्यासाठी उमेदवारांनी उभारलेल्या बुथवरील कार्यकर्त्यांची मदत मतदारांना नाईलाजास्तव घ्यावी लागली. काही ठिकाणी मतदार स्लीप आणि केंद्रांवरील मतदार यादीतही तफावत आढळली. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदानासाठी ४ ते ५ खोल्यांची व्यवस्था होती. मतदानाची खोली शोधण्यातही मतदारांना वेळ खर्ची घालावा लागला. मतदानाबाबत मतदारांमध्ये उत्साह होता. परंतु, प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनाअभावी त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. (प्रतिनिधी)
उमेदवारांच्या चिन्हांवर शाई
मतदान यंत्रांवर उमेदवारांच्या चिन्हांवर बोटाची शाई लावून चिन्हे काळी करण्याचे प्रकार काही मतदार जाणीवपूर्वक करीत असल्याची कुजबुज काही मतदान केंद्रांवर होती. त्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अधून-मधून मतदान यंत्रांची पाहणी करताना आढळले.