पोलीस चौक्यांमध्ये सुविधांची वानवा, चौक्या स्मार्ट होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:41 AM2019-08-12T02:41:18+5:302019-08-12T02:44:05+5:30

२४ तास आॅन ड्युटी असणारा पोलीस कर्मचारी कशा परिस्थितीत काम करतो, याचा आढावा ‘लोकमत’चे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर, प्रशांत माने, सदानंद नाईक, धीरज परब यांनी घेतला आहे.

when police outlets will be smart ? | पोलीस चौक्यांमध्ये सुविधांची वानवा, चौक्या स्मार्ट होणार का?

पोलीस चौक्यांमध्ये सुविधांची वानवा, चौक्या स्मार्ट होणार का?

googlenewsNext

शहरात गुन्हेगारी वाढली की आपण पोलिसांना नावे ठेवून मोकळे होतो. पण ते कुठल्या परिस्थितीत काम करतात, याची आपल्याला जाणीव नाही. स्मार्ट सिटीच्या गप्पा ठोकणाऱ्यांनी आधी पोलीस चौक्या सुधारा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. २४ तास आॅन ड्युटी असणारा पोलीस कर्मचारी कशा परिस्थितीत काम करतो, याचा आढावा ‘लोकमत’चे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर, प्रशांत माने,
सदानंद नाईक, धीरज परब यांनी घेतला आहे.

अत्यंत कोंदट आणि अपुरी जागा, फिर्यादी सोडा पोलीस कर्मचाऱ्यांनाही बसायची सोय नाही. कुठे गळके छप्पर तर कुठे पत्र्याच्या टपरीमध्ये ‘स्मार्ट सिटी’असलेल्या ठाणे शहरातील पोलीस चौक्यांचा कारभार सुरु आहे. फिर्याद कुणाकडे देणार? आहे त्या मनुष्यबळामध्ये आणि आहे त्या सोयी सुविधांमध्ये फक्त ‘आॅन ड्युटी २४ तास’ इमाने इतबारे नोकरी करा, असे आदेश असल्यामुळे कोणतीही कुरकूर न करता या पोलीस कर्मचाºयांना चौकीची ड्युटी बजवावी लागत आहे.

ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांमध्ये १३ पोलीस ठाणी आहेत. त्यामध्ये प्रत्येकी तीन ते चार अशा सुमारे ४० पोलीस चौक्यांचा समावेश आहे. पुण्याच्या धर्तीवर ठाण्यातही पोलीस चौकीतच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही काही वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली होती. पण, ती योजना कालांतराने बारगळली. एखाद्या फिर्यादीला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाईपर्यंत मोठा अवधी जातो. त्यामुळे त्या परिसराच्या जवळ असलेल्या पोलीस चौकीमध्येच तक्रार दिली तर फिर्यादी आणि पोलीस या दोघांचाही यात वेळ वाचावा. हा त्यामागचा उद्देश होता. शिवाय, तक्रारींचेही तातडीने निराकरण करणे यातून शक्य होते. नंतर ती फिर्याद पोलीस ठाण्यात वर्ग करून पोलीस तपास केला जातो. पण ही योजना कागदावरच राहिली. तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या काळातही पोलीस चौकी अधिकारी कर्मचारी, शस्त्र सामग्री तसेच सोयी सुविधांनी सुसज्ज करण्याची योजना होती. या योजनेनेही फार तग धरला नाही. आता जेमतेम मोजक्या पोलीस चौक्या वगळल्या तर अनेक ठिकाणी पोलीस कर्मचाºयांना किंवा फिर्यादींना बसण्याचीही सुविधा नाही. काही ठिकाणी वीज आणि पाणी या अगदी मूलभूत सुविधाही नाहीत. शहराचे नाक असलेल्या मासुंदा तलावाजवळील जांभळी नाका येथे तर एका छोटया पत्र्याच्या टपरीमध्ये पोलीस चौकीचा कारभार करावा लागतो. त्यामुळे चौकीपेक्षा गस्तीवर राहिलेले बरे अशीच या पोलीस कर्मचाºयांची अबोल प्रतिक्रिया असते.

जिल्हाधिकारी कार्यालयासह, न्यायालय, कारागृह, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह रेल्वे स्थानक, एसटी स्थानक, सॅटिस स्थानक आणि मुख्य बाजारपेठ असे मोठे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये चेंदणी कोळीवाडा, कोर्ट नाका, बाजारपेठ आणि एसटी स्थानक अशा चार पोलीस चौक्या आहेत. रोज १० ते १५ लाख प्रवाशांची वर्दळ या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत होते. त्यामुळे बॅग चोरी, एसटी स्थानकातील पाकीटचोरी, वाहनचोरी, विनयभंग, महिलांच्या तसेच विद्यार्थीनींच्या छेडछाडीचे गुन्हे हे एसटी स्थानक चौकीमध्ये नोंद होतात. पण, या चौकीतच अंधाराचे साम्राज्य आहे. वीज आणि पाण्याचा अभाव आहे. बसायला जागा अपुरी. त्यामुळे सुविधांअभावी चौकीकडे पोलिसच फिरकत नाही. तिथे फिर्यादींची अवस्था न विचारलेली बरी. मूळात, या प्रवाशांची मोठी संख्या, सराफ आणि कापडाच्याही बाजारपेठेचा परिसर असल्यामुळे ग्राहकांचीही संख्या येथे तितकीच मोठी आहे. त्यातच या परिसरात बतावणी करुन फसविणाºया ठगांची कमी नाही. पार्किंगची सुविधा नसल्यामुळे मोटारसायकल कुठून कशी चोरी होईल, याची शाश्वती नाही. अशावेळी पोलीस चौकीचा आधार घ्यावा, तर त्यांचीही अवस्था बिकट आहे.

सुविधांचा अभाव : कोर्ट नाका चौकी : जांभळी नाक्यापासून अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर कोर्ट नाका पोलीस चौकी आहे. तळ अधिक एक दहा बाय दहाच्या जागेतून या चौकीचा कारभार चालतो. मोर्चे आणि वाहतुकीची वर्दळ हाताळणारे या चौकीचे कर्मचारी सुविधांच्या प्रतिक्षेत आहेत.

बांधकाम चांगले : बी केबिन पोलीस चौकी : नौपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाºया या चौकीमध्ये कोपरी उड्डाणपूल ते राममारुती रोडपर्यंतचा परिसर येतो. शाळा आणि सराफांची मोठी दुकानेही याच परिसरात आहेत. इतर चौक्यांच्या तुलनेत ही चौकी त्यातल्यात्यात बरी आहे. बांधकामही चांगले आहे.

स्वच्छतागृहाची सोय नाही : धोबी आळी (नौपाडा) : धोबीआळी या पोलीस चौकीचे नव्यानेच बांधकाम झाले आहे. चौकीची वास्तू चांगल्या अवस्थेमध्ये आहे. चौकीत स्वच्छतागृह आणि पाण्याची सुविधा नसल्यामुळे जवळच्याच सिनेगॉग प्रार्थनास्थळाचाच पोलिसांना आधार मिळतो.

पोलीस कर्मचारी उपेक्षित : विष्णूनगर (नौपाडा) : राममारूती रोड, मासुंदा तलाव आणि गडकरी रंगायतन असा परिसर या चौकीच्या अंतर्गत येतो. खुर्च्या, टेबल, पाणी आणि स्वच्छतागृह या सुविधांचा येथे अभाव आहे. त्यामुळे व्यापारी, निवासी संकुल, रुग्णालयाच्या सुरक्षेचा भार सांभाळणारे कर्मचारी उपेक्षित आहेत.

पत्र्याच्या केबिनमध्ये कारभार
जांभळी नाका चौकी: बाजारपेठेपासून कोर्ट नाक्याकडे जाणाºया पहिल्याच चौकात जांभळी नाका पोलीस चौकीचा कारभार एका छोटया पत्र्याच्या केबिनमध्ये सुरू आहे. जेमतेम दोन ते तीन कर्मचारी बसतील इतकीच जागा. पाकिटमार, भुरटे, सराईत चोरटे आणि फसवणूक करणाºयांची संख्या या परिसरात लक्षणीय आहे. मोठी गर्दी झालीच तर पोलीस कर्मचाºयालाच बाहेर यावे लागते. किंवा नागरिकांनी बाहेर उभे राहूनच आपले गाºहाणे मांडायचे. त्यामुळे पाणी, स्वच्छतागृह किंवा आरामासाठी जागा यापैकी कसलीच अपेक्षा येथे पोलिसांना ठेवता येत नाही.


कल्याण-डोंबिवलीत कायद्याच्या रक्षकाच्या ‘चौकी’ला अवकळा



शहरातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा, सुव्यवस्था ढासळू नये म्हणून पोलीस चौक्या उभारल्या जातात. पण कल्याण-डोंबिवलीतील चौकींची परिस्थिती पाहून खुराडं आहे की काय असा प्रश्न मनात निर्माण होतो. जर काम करण्यासारखे वातावरणच जर नसेल तर पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य कसे बजावणार हाही यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. या पोलीस चौक्यांच्या दुरवस्थेकडे नेत्यांचे लक्ष जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. गृहखाते सांभाळणाऱ्यांपर्यंत अशा चौक्यांची माहिती दिली जाते का हा एक संशोधनाचाच विषय ठरेल.

एखादा गुन्हा घडल्यानंतर नागरिकांना वेळीच पोलिसांची मदत मिळावी, गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे शक्य व्हावे यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन किंवा चार पोलीस चौक्या उभारल्या आहेत. चौकीत नेमलेल्या पोलिसांनी आपल्या चौकीच्या हद्दीत गुन्हेगारीवर वचक ठेवणे अपेक्षित आहे. मात्र या चौक्या उभारण्याचा उद्देश सफल झाला नसल्याचे चित्र कल्याण- डोंबिवली परिसरात पाहयला मिळत आहे. अपुºया मनुष्यबळामुळे एकीकडे कायदा सुव्यवस्था राखणे पोलिसांसाठी जिकरीचे बनले असताना दुसरीकडे सुरक्षेकरिता ठिकठिकाणी उभारलेल्या चौक्याही ओस पडल्या आहेत. त्यामुळे तातडीची मदत द्यायची तरी कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. कुलूप बंद, दुरवस्था आणि सुविधांचा अभाव हे चौक्यांचे सद्यस्थिीतील वास्तव पाहता एखाद्या गुन्हयाची तक्रार करण्यासाठी तसेच मदत मिळण्यासाठी नागरिकांना पोलीस ठाण्याचीच वाट धरावी लागते.
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या वाक्याप्रमाणे पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. शहराच्या विस्तारामुळे पोलीस ठाण्यांची हद्द वाढलेली आहे. पोलीस ठाण्यातून हद्दीत सर्वत्र लक्ष ठेवणे अशक्य असल्याने चौक्यांची निर्मिती करण्यात येते. कल्याण- डोंबिवली परिक्षेत्रात एकूण आठ पोलीस ठाणी आहेत. यात डोंबिवलीमधील रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर आणि मानपाडा या चार तर कल्याणमधील खडकपाडा, कोळसेवाडी, बाजारपेठ आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यांचा समावेश होतो.
डोंबिवली हे सांस्कृतिक तर कल्याण हे ऐतिहासिक शहर म्हणून गणले जाते. कल्याणची ओळख ही ऐतिहासिक असली तरी, ते संवेदनशील शहर म्हणूनही परिचित आहे. एकीकडे या शहरांमध्ये झपाटयाने वाढते नागरीकरण पाहता कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे हे आद्यकर्तव्य गृहविभागाचे आहे. या अनुषंगाने कल्याण परिमंडळ परिक्षेत्रामध्येही ठिकठिकाणी पोलीस चौक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. गृहविभागाकडून मिळालेली आर्थिक मदत, सामाजिक संस्थांकडून लाभलेले सहकार्य किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आमदार आणि नगरसेवक निधी देत चौक्यांच्या उभारणीला हातभार लावला आहे. दिवसागणिक भरमसाठ वाढणारी लोकसंख्या आणि वाढणाºया गुन्हयांचा कल पाहता आणखी पोलीस ठाण्यांची निर्मिती व्हावी असा प्रस्ताव मांडला जात असताना दुसरीकडे अपुºया मनुष्यबळामुळे सुरक्षेसाठी हद्दीत उभारण्यात आलेल्या चौक्याही बंद करण्याची वेळ पोलीस विभागावर आली आहे .
कल्याण परिमंडळ परिक्षेत्रात एकूण ३३ पोलीस चौक्या आहेत. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सर्व पोलीस चौक्यांची दुरूस्ती करून त्यांना स्वच्छतागृहे आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन केडीएमसीचे तत्कालीन पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी २०१६ मध्ये दिले होते.
कल्याण शहरात १९ चौक्या असून १५ बीटमार्शल आहेत. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत बस स्टँड, सहजानंद चौक, पौर्णिमा, चिकणघर, वालधुनी अशा ५ चौक्या आणि यासाठी ५ बीटमार्शल आहेत. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत मोहने, वायलेनगर, आधारवाडी, बिर्ला महाविद्यालय अशा ४ चौक्या असून यासाठी ४ बीटमार्शल आहेत. बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत वल्लीपीर, एपीएमसी मार्केट, टिळक चौक, लालचौकी अशा ४ चौक्या आणि ३ बीट मार्शल आहेत. तर कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत पत्रीपूल, नेतीवली, विजयनगर, लोकग्राम, खडेगोळवली, आनंदवाडी अशा ६ चौक्या आणि ३ बीट मार्शल आहेत.
डोंबिवलीत १४ चौक्या असून १३ बीटमार्शल आहेत. रामनगर पोलीस ठाणे हद्दीत आयरे, पाथर्ली चौकी, ठाकुर्ली चौकी अशा ३ चौक्या आणि ३ बीट मार्शल आहेत. विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत कोपर, स्टेशन चौकी, सम्राट चौकी, उमेशनगर चौकी अशा ४ चौक्या आणि ३ बीटमार्शल आहेत. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत काटई चौकी, पी. अँड टी (गांधीनगर) चौकी, पेंढरकर चौकी आणि रिजन्सी चौकी अशा ४ चौक्या आणि ४ बीटमार्शल आहेत. टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी उद्योग नगर, कचोरे आणि गोपाळनगर अशा चौक्या आहेत.


उल्हासनगरला गुन्हेगारीत झाली वाढ

नागरिकांच्या सुरक्षेसाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी बांधलेल्या बहुतांश पोलीस चौकी बंद आहे. पोलीस चौकी बंद पडल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. पोलिसांची संख्या कमी असल्याने चौकी बंद आहेत. मात्र बिट मार्शलची नियुक्ती झाल्याने त्या पूर्ववत सुरू करण्याचा मानस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी व्यक्त केला.वाढत्या गुन्ह्यांच्या घटना पाहता नागरिकांनी बंद पडलेल्या पोलीस चौकी सुरू करा, अशी मागणी करत आहेत. एकेकाळी गुन्हेगारीने तोंड काढल्याने, विविध ठिकाणी पोलीस चौकी बांधल्या होत्या.
उल्हासनगर पूर्व रेल्वेस्थानका बाहेरील पोलीस चौकी बंद झाल्याने स्थानक परिसरात गुन्ह्यात वाढ झाली असून पोलिसही हैराण झाले आहेत. तत्कालिन पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त व संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सकारात्मक भूमिका घेऊन पोलीस चौकी उभारण्याला प्राधान्य दिले होते. प्रत्येक चौकीत २४ तास पोलीस तैनात ठेऊन परिसरात काही भांडण झाल्यास पोलीस चौकीत प्रथम मिटवला जात होता. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जात होता. तसेच स्थानिक नागरिकांना सुरक्षित वाटून गुन्हेगारीत घट झाली होती.
चांदीबाई कॉलेज बाहेरील, उल्हासनगर पूर्वे, शहाड पूर्व व विठ्ठलवाडी पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेर, डॉ. आंबेडकर चौक, भरतनगर, गुरूनानक स्कूल परिसर, कॅम्प नं-५ मुख्य मार्केट, कॅम्प नं-५ कैलास कॉलनी प्रवेशद्बार, गायकवाड पाडा, कॅम्प नं-३ कृष्णानी चौक, चोपडा कोर्ट, साईबाबा मंदिर, गोलमैदान, मराठा सेक्शन, पवई चौक, शांतीनगर प्रवेशद्बार, खेमानी, भैय्यासाहेब आंबेडकरनगर, चालिया मंदिर, झुलेलाल मंदिर आदी अनेक ठिकाणी गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी चौकी आहेत. मात्र बहुतांश बंद असून त्यांना कुलूप आहे. यामुळे गुन्हेगारी वाढली आहे.


मीरा-भार्इंदरमधील पोलीस चौकी बेवारस


मीरा- भार्इंदरमध्ये जवळपास २१ पोलीस चौकी आहेत. नागरिकांच्या पैशातून लाखोंचा खर्च करून पोलीस चौकी बांधायच्या पण त्याचा उपयोग मात्र नागरिकांच्या हितासाठी केला जात नसल्याने शहरातील बहुतांश चौकी खुद्द पोलीस मायबाप असूनही बेवारसच आहेत. बंद वा दुरवस्थेतील चौकी म्हणजे पोलीस प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडेच म्हणावे लागतील. मीरा-भार्इंदरमध्ये पोलीस चौकी बांधण्याच्या मागण्या नागरिकांसह लोकप्रतिनिधी, राजकारणी , संस्था सातत्याने करत असतात. अगदी चौकी स्वखर्चाने बांधून देण्यासाठी बिल्डर तर तयार असतातच. लोकप्रतिनिधी देखील महापालिकेच्या निधीचा वापर चौकी बांधण्यासाठी करत असतात. चौकी बांधून झाल्या पण त्यात पोलिसच बसत नसतील तर चौकीसाठी केलेला खर्च हा फुकटच जातो. त्यातही अनधिकृत चौकीवर कारवाईचे न्यायालयाचेही आदेश पायदळी तुडवले जातात.

पोलिसच जर अनधिकृत चौकी व पोलीस ठाण्यांच्या इमारतीमधून कामकाज करत असतील तर काय बोलणार. मीरा रोडच्या विजयपार्क भागात नगरसेवक आणि पालिका निधीतून भररस्त्यात चौकी बांधण्यास काशिमीरा पोलीस आणि पालिकेने मंजुरी दिली होती. पण रस्त्यावर चौकी बांधता येणार नाही या उच्च न्यायालयाच्या दणक्याने ती बेकायदा चौकी झाली नाही. मीरा रोड पोलीस ठाणे हे कनकिया बिल्डरने बांधून दिले होते. या पोलीस ठाणे अखत्यारित सध्या बेव्हर्ली पार्क, शांतीपार्क व श्रीकांत जिचकार चौक अशा तीन चौकी येतात. तर नयानगर पोलीस ठाणे हद्दीत हैदरी चौक, रसाझ व रेल्वेस्थानकाजवळील तीन चौकी आहेत. यातील जवळपास सर्वच चौकी सुरू आहेत. काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत वरसावे, सृष्टी येथे दोन चौकी आहेत. जाफरी खाडी पात्र व कांदळवनात नगरसेवक निधीतून पोलीस चौकी बनवण्यात आली.

चौकी असूनही आजूबाजूला बेकायदा बारचे आणि अन्य बांधकाम वाढत आहे. रात्री तर बारच्या बाहेर व्यसनी आणि मद्यपींची बाजूला पोलीस चौकी असूनही जत्रा भरते हे विशेष. उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत उत्तन नाका, डोंगरी व चौक अशा ३ पोलीस चौकी आहेत. चौक जेट्टीची चौकी वादग्रस्त लोकांकडून देणगी म्हणून पोलिसांनी घेतली. समुद्र आणि खाडीच्या या संगमावर असलेली जेटी व परिसर तसा संवेदनशील आहे. तरीही येथील पोलीस चौकी कायम बंदच असते. अन्य दोन चौकी सुरू आहेत. चौकी तर सोडा पण उत्तन पोलीस ठाण्याची इमारत अनेक महिन्यांपासून तयार होऊन पडली आहे. भार्इंदर पश्चिमेला बालाजीनगर, गणेश देवलनगर, उड्डाणपुलाखाली व नाझरेथ आगर झोपडपट्टी येथे चौकी आहेत. बालाजीनगर रेल्वे स्थानकासमोर चार वर्षा पूर्वी पोलीस चौकी बांधण्यात आली. मात्र तेथे आजही पोलीस बसत नाहीत.


ठाण्यातील पोलीस चौक्यांचे चित्र

वागळे इस्टेट परिमंडळातील वर्तकनगर पोलीस ठाण्यातंर्गत वर्तकनगर नाका, वुडन ब्रिज, लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन, येऊर गाव आणि सावरकरनगर या पाच पोलीस चौक्यांचा समावेश होतो. यातील वर्तकनगर नाका ही चौकी रस्ता रूंदीकरणामध्ये बाधित झाली होती. ठाणे महापालिकेने नाक्यावरच तिचे पुनर्वसन करुन बांधकामही करुन दिले आहे. शिवाय, मोठी प्रशस्त जागा असल्यामुळे पाच ते सहा कर्मचारी आरामशीर बसू शकतात. चौकीची निम्मी भिंत काचेची असल्यामुळे बाहेर सुरक्षा ठेवणे चौकीतील कर्मचाऱ्याला बाहेर न पडताही शक्य होते. बाहेरची वाहतूक कोंडी किंवा कोणत्याही अनुचित प्रकाराकडे पोलीस सहज लक्ष देतात. याच चौकीतील कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी इमारतीवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया तरुणाला विश्वासात घेऊन मोठया कौशल्याने वाचविले होते. त्यामुळे या चौकीचा या परिसरातील नागरिकांना मोठा आधार वाटतो.

वुडन ब्रिज ही चौकी एका सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून उभी राहिली आहे. आधी ही चौकी एका टपरीसारख्या केबिनमध्ये सुरू होती. आता तिचे चांगले बांधकाम झाल्यामुळे या भागातील गस्तीसाठी या चौकीचा पोलीस आणि रहिवाशांना चांगलाच फायदा होतो. शिवाईनगर ते उपवन या परिसरात महिलांची सोनसाखळी खेचण्याचे प्रकार नेहमीच घडतात. याशिवाय, कारमधील टेप आणि इतर सामग्री चोरण्याचे प्रमाणही या परिसरात असल्यामुळे हे आव्हान या चौकीतील कर्मचाºयांना असते.

सावरकरनगर, यशोधननगर या परिसरासाठी ही पोलीस चौकी कार्यान्वित आहे. बांधकाम धोकादायक झाल्यामुळे या वास्तुच्या दुरुस्तीची गरज आहे. जेमतेम पाच ते सहा कर्मचारी बसतील इतकी जागा. इतर कोणतीच सुविधा याठिकाणी नाही. रिक्षा, मोटारसायकल गॅरेज, नाका कामगार आणि निवासी संकुले असा मोठा भाग या परिसरात येतो. किरकोळ भांडणे आणि घरफोडयांचे येथे आव्हान आहे. किमान एक कर्मचारी या चौकीत असावा, अशी या परिसरातील रहिवाशांची मागणी आहे.

चितळसर पोलीस ठाण्यांतर्गत गांधीनगर ही एकमेव पोलीस चौकी येते. वसंतविहार, सिद्धांचल, लोकपूरम आणि हिरानंदानी इस्टेट असा संपूर्ण उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर या चौकीच्या अंतर्गत येतो. वाहनाच्या काचेवर टकटक करून फसवणूक करणारे, काच फोडून कारमधील ऐवज लंपास करणारे आणि आॅनलाईन फसवणूक करणाºयांची संख्या या भागात मोठी आहे. एक वर्षभरापूर्वी रस्ता रुंदीकरणामध्ये ठाणे महापालिकेने ही चौकी तोडली. पण तिचे पुनर्वसन अद्यापही झाले नाही.
वाहतूक शाखेच्या पोलीस चौक्यांची यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. नितीन कंपनी समोरील उड्डाणपुलाच्या खाली वागळे इस्टेट युनिटची वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाºयांची चौकी आहे. कंटेनरच्या केबिनमध्ये या चौकीचा कारभार सुरू आहे. अपुरी जागा स्वच्छतागृहाचीही सोय नाही. तशाही परिस्थितीमध्ये नियम मोडणाºया चालकांना आणि वाहतूक कोंडीचा सामना करत ड्युटी बजवावी लागते, असे येथील कर्मचारी सांगतात.

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यांतर्गत ज्ञानेश्वरनगर, रामचंद्रनगर, हाजुरी, मॉडेला चेक नाका आणि रहेजा गार्डन या चौक्यांचा समावेश होतो. रामचंद्रनगर आणि ज्ञानेश्वरनगर या दोन पोलीस चौक्यांचे बांधकाम लोकसहभागातून झाले आहे. तर रहेजा गार्डन या चौकीची जागा आणि बांधकाम प्रशस्त आहे. महापालिकेने दिलेल्या जागेवर एका खासगी विकासकाने तिचे बांधकाम केले आहे. त्याच धर्तीवर शहरातील इतरही पोलीस चौक्यांचे बांधकाम होणे गरजेचे आहे.

 

Web Title: when police outlets will be smart ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.