मार्गदर्शक सूचनांचा ‘श्रीगणेशा’ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:59+5:302021-08-17T04:46:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव दीड दिवसांचा साधेपणाने साजरा केला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव दीड दिवसांचा साधेपणाने साजरा केला होता. यंदा कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. काही दिवसांवर गणेशोत्सव आला तरी स्थानिक पातळीवर केडीएमसीला गणेश मंडळांच्या बैठका घ्यायला तसेच मार्गदर्शक सूचना जाहीर करायला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. परिणामी कल्याण-डोंबिवली शहरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मागील वर्षी २२ ऑगस्टला गणपतींचे आगमन झाले होते. परंतु, जुलै व ऑगस्टमधील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कोरोनाचे सावट होते. केडीएमसीने त्यावेळी घरगुती व सार्वजनिक गणपतींचे आगमन आणि विसर्जनाबाबत सूचना जारी केल्या होत्या. गणेशमूर्तीच्या उंचीवरही मर्यादा होत्या. गर्दी टाळण्यासाठी श्री गणेशाच्या दर्शनासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑनलाइन सुविधांवर भर होता.
केडीएमसी हद्दीत २९१ नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळे आहेत. यंदा १० सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. आगमनाला काही दिवस शिल्लक असताना अद्याप केडीएमसीने गणेश मंडळांची बैठक अथवा उत्सव साजरा करण्याबाबत कोणत्याही सूचना केल्या दिलेल्या नाहीत. मनपा क्षेत्रात सध्या नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट कायम असल्याने मनपाने तातडीने बैठक घेऊन सूचना द्याव्यात, जेणेकरून गणेशोत्सव मंडळांतील संभ्रम दूर होईल, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे. यासंदर्भात मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
शुल्क आकारण्यात येऊ नये
- गेल्या वर्षी १० बाय १० फुटांच्या मंडपाचे बंधन होते. याचे जो पालन करेल, त्याला मात्र कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापेक्षा अधिक आकाराचा मंडप असेल तर पाच रुपये फूट याप्रमाणे शुल्क आकारले गेले होते. परंतु, यंदा कोणत्याही सूचना मनपाने दिलेल्या नाहीत. दरम्यान, शुल्क यंदा आकारू नये, अशी मागणी गणेश मंडळांची आहे.
- लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे नुकसान झाल्याने गणेश मंडळांनी यंदाही वर्गणी न काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात बहुतांश मंडळांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या पैशातून पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत केली आहे. तर, काही मंडळांनी गरजवंतांना धान्य वाटप, ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या बाबींचा विचार करून शुल्क माफ करावे, असे पत्र कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्था यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.
- डोंबिवलीतील अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक, सल्लागार प्रकाश भोईर यांनीही शुल्क आकारू नये, असे मत मांडले आहे. कोरोनाचे सावट आजही कायम आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाही वर्गणी गोळा केली जाणार नाही. मनपाने शुल्क माफ करून मंडळांना दिलासा द्यावा, याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे.
------------