राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर असताना सर्वसामान्य जनतेला काँग्रेसचाच आधार - विश्वजीत कदम
By नितीन पंडित | Published: August 16, 2023 05:39 PM2023-08-16T17:39:32+5:302023-08-16T17:52:48+5:30
मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या भिवंडी लोकसभा आढावा बैठकी प्रसंगी कदम बोलत होते.
भिवंडी: देशात व राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपाने खिंडार पाडले यातून राज्यात भाजपचीही ताकद कमी असल्याचे सिद्ध झाले असून अशा परिस्थितीत आता सर्वसामान्य जनतेला काँग्रेस हाच एकमेव आधार वाटत आहे असे वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केले बुधवारी केले आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या भिवंडी लोकसभा आढावा बैठकी प्रसंगी कदम बोलत होते.
काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा समन्वयक राजेश शर्मा, माजी खासदार सुरेश टावरे,माजी आमदार रशीद ताहीर, प्रदेश पदाधिकारी राजन भोसले,शेतकरी आघाडीचे पराग पष्टे,राणी अग्रवाल, काँग्रेस माथाडी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष छगन पाटील,काँग्रेस पदाधिकारी राकेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत.२०१४ पासून भाजपाने जनतेची पिळवणूक सुरू केली आहे. खोटी आश्वासने, महागाई,बेरोजगारी यामुळे सर्व जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेस काळातील अनेक लोकोपयोगी कायद्यात बदल करून श्रीमंतांना फायदा पोहोचवण्याचे काम भाजपाने केले आहे. मणिपूर सारख्या दुर्दैवी घटनेकडे मोदी सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.
भाजपाची स्वतःची राजकीय ताकद नसल्यामुळे त्यांनी नऊ राज्यातील विविध पक्षांचे सरकार पाडण्याचे काम केले असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे चांगले काम सुरु असताना केंद्रातील भाजपाने सोयीचे राजकारण करत शिवसेना आणि त्या पाठोपात राष्ट्रवादीत फूट पाडली.ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती मोदींनी टीका केली मात्र अवघ्या तीन दिवसात चित्र बदलले आणि राज्यात राष्ट्रवादीला सोबत घेतले आणि मोदींना आपले टिकेचे शब्द गिळून घ्यावे लागले अशी टीका देखील कदम यांनी यावेळी केली.
राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची चर्चा जगात झाली आणि त्यामुळेच काँग्रेस आज संपूर्ण ताकतीने देशात उभा राहत आहे.भिवंडी लोकसभा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे.या ठिकाणी काँग्रेसला पोषक वातावरण आहे त्यामुळे काँग्रेसला स्वतंत्र लढावे लागले तर भिवंडीत काय परिस्थिती आहे त्याची चाचणी या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येणार असून लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्याचा अहवाल आपण पक्षश्रेष्ठींना सोपविणार असल्याचे मत यावेळी विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.