कमी पटसंख्येच्या शाळा बंद कधी?
By admin | Published: August 6, 2015 11:35 PM2015-08-06T23:35:48+5:302015-08-06T23:35:48+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाने ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येची कसून चौकशी केली असता सुमारे
सुरेश लोखंडे ,ठाणे
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाने ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येची कसून चौकशी केली असता सुमारे ५८० शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आढळले होते. याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षातदेखील सुमारे ३९० शाळा आढळल्या आहेत. परंतु, शासन आदेशानुसार त्या बंद करण्यात ठाणे जिल्हा परिषद व महापालिका अपयशी ठरले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रासह शिक्षक वेतनावर शासनाचा मोठ्याप्रमाणात खर्च होत आहे. या तुलनेत लाभार्थी विद्यार्थी संख्या कमी आढळल्यामुळे राज्य शासनाने सुमारे एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनुदानित शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येचे सर्वेक्षण केले होते. कोणाचे हितसंबंध राखण्यासाठी ही हलगर्जी होते आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १७०० शाळा शिल्लक राहिल्या असता त्यातील सुमारे ३१६ शाळा बंद होण्यास पात्र ठरल्या होत्या. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी, दुर्गम भागात सुमारे १८५५ शाळा आहेत. यापैकी २६४ शाळांची पटसंख्या कमी असल्याचे आढळून आले आहेत. बहुतांशी आदिवासी कुटुंबे पाल्यासह गावपाडे सोडून कामासाठी अन्यत्र स्थलांतर करतात. यामुळे शाळेत बहुधा विद्यार्थी नसतोच. यानुसार ठाणे, पालघर जिल्ह्यांत सुमारे ५८० शाळा कोणत्याही क्षणी कायमस्वरूपी बंद होण्याचे संकेत मागील एक वर्षापासून आहेत. मात्र, त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. ती कशामुळे हा प्रश्न आहे.
यंदा ठाणे जिल्ह्यातील ३९० शाळांवर कारवाईची टांगती तलवार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांतील शाळांचा यात समावेश आहे. तर पालघरच्या जव्हार, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यांच्या शाळा बंद करण्यास पात्र ठरल्या आहेत. काही खाजगी शाळांवर कारवाई केली असता ठाणे जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे १७० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरविण्यात आलेले आहेत.