अंतर्गत निवडणुकांना मुहूर्त कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 03:22 AM2019-04-04T03:22:53+5:302019-04-04T03:23:19+5:30
केडीएमसी : आचारसंहिता समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा
कल्याण : केडीएमसीच्या परिवहन समितीचे सभापतीपद, शिक्षण समिती सदस्य, सभापती आणि प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने आचारसंहिता छाननी समितीचे मत मागवले आहे. परंतु, अद्याप समितीने कोणताही निर्णय दिलेला नसल्याने या निवडणुका होणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे.
केडीएमसीच्या परिवहन समितीमधील सहा रिक्त झालेल्या जागांवर नव्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक केव्हा होणार? याबाबत सदस्यांना उत्सुकता लागली आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती कोकण विभागीय आयुक्तांनी केली आहे. मात्र, अद्याप निवडणुकीची तारीख मिळालेली नाही. त्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत, अशा निवडणुका घेता येतात का? याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने मुख्य सचिवांच्या आचारसंहिता छाननी समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्गदर्शन मागवले आहे.
परिवहन समितीपाठोपाठ शिक्षण समिती सदस्य व सभापती, १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकाही आहेत. परंतु, परिवहन सभापती निवडणूक घेण्याबाबत अद्यापपर्यंत निर्णय न झाल्याने अन्य निवडणुकाही रखडणार आहेत. दुसरीकडे अंबरनाथ, उल्हासनगर महापालिकांमधील अंतर्गत निवडणुकाही यामुळे खोळंबल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेतील स्थायी, शिक्षण, बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने त्या निवडणुका घेण्यातही आल्या. परंतु, कल्याण महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत निवडणुकांबाबत आयोगाकडून कोणताही निर्णय अद्यापपर्यंत दिला गेलेला नसल्याने प्रतीक्षा कायम राहिली आहे.
निवडणुकीत सर्व व्यस्त
सध्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अधिकारी व सर्वच राजकीय
पक्षांचे पदाधिकारीही व्यस्त झाले आहेत. त्यामुळे २९ एप्रिलला मतदान झाल्यानंतरच अंतर्गत निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.