तोल गेल्याने लोकलमधून पडून युवकाचा मृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:52 AM2019-02-07T05:52:13+5:302019-02-07T05:53:28+5:30
धावत्या जलद लोकलमधून पडून डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील विपेंद्र यादव (२०) याचा मृत्यू झाल्याची घटना कोपर रेल्वेस्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली.
डोंबिवली - धावत्या जलद लोकलमधून पडून डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील विपेंद्र यादव (२०) याचा मृत्यू झाल्याची घटना कोपर रेल्वेस्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. डोंबिवली रेल्वेस्थानकातून मुंबईला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये तो चढला होता. लोकलमधील गर्दीतून आत जाण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि हा अपघात घडला.
डोंबिवली लोहमार्ग पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपेंद्र हा नोकरीनिमित्त लोकलने प्रवास करत होता. अपघातानंतर त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी माहिती दिली. रविवारी याच स्थानकात मायलेकासह एका महिलेचा रेल्वेरूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला होता.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधावी, यासाठी भाजपाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर, आरपीएफ डोंबिवली आणि प्रवाशांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. बुधवारीही हा उपक्रम सुरू असतानाच अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पेडणेकर यांना दिली. त्यानुसार, पेडणेकर यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस यंत्रणेला अपघाताची माहिती दिली. विपेंद्रजवळच्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याबाबत तातडीने कळवले.