ठाण्याच्या धर्तीवर कल्याण, डोंबिवलीत कारवाई कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:37+5:302021-09-27T04:44:37+5:30
कल्याण : ठाण्यातील खड्ड्यांची पालकमंत्री पाहणी करतात. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली जाते. ठाण्यापेक्षा जास्त कल्याण डोंबिववली रस्त्यावर ...
कल्याण : ठाण्यातील खड्ड्यांची पालकमंत्री पाहणी करतात. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली जाते. ठाण्यापेक्षा जास्त कल्याण डोंबिववली रस्त्यावर खड्डे आहेत. कल्याण डोंबिवलीतील अधिकाऱ्यांच्या विरोधात कधी कारवाई केली जाणार, असा संतप्त सवाल भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी रविवारी केला. खड्डे प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दोन वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी गेले होते. त्यानंतरही खड्डे भरले जात नाहीत. रस्ते भरण्याच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही दरवर्षी पावसाळ्य़ात खड्ड्यांचा प्रश्न कायम असतो. केवळ कल्याण डोंबिवलीत नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. इतकेच नाही तर कल्याण शीळफाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. त्यावर खड्डे दिसत नसले तरी गाडी आदळत जाते. त्या अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई केली गेली पाहिजे. मलवाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेने ४५० कोटी रुपये खड्ड्यांत घालविले आहेत. एकही काम झालेले नाही. सिग्नल यंत्रणेसाठी १६० कोटी रुपये खर्च केले होते. ती सुद्धा सुरू नाही. याची चौकशी झाली पाहिजे. ठाण्याच्या धर्तीवर कारवाई झाली पाहिजे.
दरम्यान, भाजप आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, अधिकाऱ्यांना निलंबित करण्यापेक्षा रस्ते कॉंक्रिटचे केले तर त्याचा फायदा नागरिकांना होईल. त्यासाठी पैसे देण्याची जबाबदारी शासनाची आहे, असेही ते म्हणाले.
-------------------------------------------------------