पोतडी कधी उघडणार : राज ठाकरेंचे तेच गुऱ्हाळ
By admin | Published: October 26, 2015 12:39 AM2015-10-26T00:39:58+5:302015-10-26T00:39:58+5:30
केडीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणातही सभा घेतली. त्यात त्यांनी डोंबिवलीत जे मुद्दे मांडले, तेच मांडल्याने एकंदरीतच त्यांच्या पोतडीतही फारसे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले.
अनिकेत घमंडी, डोंबिवली
केडीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणातही सभा घेतली. त्यात त्यांनी डोंबिवलीत जे मुद्दे मांडले, तेच मांडल्याने एकंदरीतच त्यांच्या पोतडीतही फारसे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी येण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास डगमगवू नका, मी येतोच आहे. माझी पोतडी अजून उघडलेली नाही, असे आश्वस्त केले होते. परंतु, गेल्या दोनही सभांंमध्ये त्यांनी भाजपाचे पॅकेज आणि रविवारच्या सभेत दसरा मेळावा, शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दाखले देत काहीशी वेळ मारून नेली. पण, पोतडी मात्र उघडली नाही. जे दोन दिवसांपूर्वीच झाले, त्याचा केवळ समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांचे पॅकेज, त्यांचे वजन यासंदर्भात टीका करणे, हे केले. तसेच दसरा मेळाव्यासंदर्भात विचारांचे सोने लुटा, याबाबतही त्यांनी पुन्हा उल्लेख केला. याखेरीज, केवळ सहन होत नसेल तर शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, हा एकमेव मुद्दा त्यातल्या त्यात वेगळा होता. याखेरीज, केडीएमसीतील २० वर्षांची सत्ता, सत्ताधाऱ्यांचे टेंडर, टक्केवारी हे मुद्दे जे दोन दिवसांपूर्वी ते डोंबिवलीत बोलले, तेच बोलले. एक पिढी सत्ताधाऱ्यांनी वाया घालवली, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे रविवारच्या भाषणात नवीन असे काहीही नव्हते. केडीएमसीतील नागरिकांना मनसेने नाशिकमध्ये काय केले, हे नको आहे. त्यांनी निवडून दिलेल्या २७ नगरसेवकांनी काय केले, यासंदर्भातची पोलखोल करावी. पत्रकार परिषदेत त्यांनीच ५० टक्के नगरसेवकांनी उल्लेखनीय काम केले नसल्याचे म्हटले होते. त्यांच्याबाबतीत काय केले जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असे जरी त्यांनी म्हटले या महापालिकेतील सत्तेला ते का चिकटून राहिले. असाही प्रश्न आहे.