समित्यांच्या निवडणुका होणार तरी कधी?, सदस्यांना लागली प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:55 AM2019-05-30T00:55:24+5:302019-05-30T00:55:27+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने केडीएमसीच्या परिवहन, पूर्व प्राथमिक शिक्षण समिती, प्रभागक्षेत्र सभापतीपदाच्या निवडणुका रखडल्या होत्या.
कल्याण : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने केडीएमसीच्या परिवहन, पूर्व प्राथमिक शिक्षण समिती, प्रभागक्षेत्र सभापतीपदाच्या निवडणुका रखडल्या होत्या. पण, आता लोकसभा निवडणुकीचे निकाल लागूनही महापालिकेतील अंतर्गत निवडणुका घेण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याने सदस्यांची प्रतीक्षा कायम राहिली आहे.
परिवहन समितीमधील सहा सदस्य २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले. रिक्त जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली. पण, अद्याप सभापतीपदाची निवडणूक झालेली नाही. विशेष बाब म्हणजे परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्तीही कोकण विभागीय आयुक्तांकडून झाली आहे. शिक्षण समिती सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने ९ मार्चला झालेल्या विशेष महासभेत नवीन समिती सदस्यही नियुक्त केले आहेत. या समितीच्या सभापतीपदाची निवडणूकही झालेली नाही. परिवहन, शिक्षण समितीसह प्रभागक्षेत्र सभापतीपदाची निवडणूकही होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. दरम्यान, आता मतमोजणी होऊन लोकसभा निवडणुकीचे निकालही लागले, पण महापालिकेतील अंतर्गत निवडणुकांच्या तारखा जाहीर करायला संबंधित यंत्रणेला अद्याप वेळ मिळालेला नाही.
>जूनच्या पहिल्या आठवड्यात परिवहन सभापती निवडणूक?
महत्त्वाचे म्हणजे केडीएमसी रामबाग खडक या प्रभाग क्रमांक २६ ची पोटनिवडणूकही जाहीर झाली आहे. २३ जूनला होणाऱ्या या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. असे असताना अंतर्गत निवडणुका होणार तरी कधी? असा सवाल परिवहन, शिक्षण समिती तसेच प्रभाग समिती सदस्यांकडून केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात परिवहन सभापतीपदाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.