कंपन्या सुरू तरी कधी होणार? उद्योगमंत्र्यांसमवेत वेबिनारद्वारे चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 02:45 AM2020-08-07T02:45:08+5:302020-08-07T02:45:45+5:30
‘कामा’चा सवाल : उद्योगमंत्र्यांसमवेत वेबिनारद्वारे चर्चा
डोंबिवली : कोरोनामुळे देशाचेच अर्थचक्र ठप्प झाले आहे. पण, त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, केडीएमसी हद्दीत दुकाने, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एमएमआरडीए हद्दीतील कारखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (कामा) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. डोंबिवली एमआयडीसीतील ४८० कारखान्यांमधील दीड लाख कामगारांच्या हाताला पुन्हा रोजगार कधी मिळेल? असा सवालही असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी यावेळी केला.
अर्थचक्रास गती देण्यासाठी उद्योजकांच्या मागणीखातर मंगळवारी वेबिनारद्वारे देसाई यांनी राज्यातील एमआयडीसीमधील उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सोनी यांनी ‘कामा’ची भूमिका मांडली. त्यावर देसाई यांनी अत्यावश्यक सेवेतील कारखान्यांबरोबरच इतर कारखानेही सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडला असल्याचे सांगितले. यासंदर्भात पुन्हा चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. कारखानदारांचे चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारखानदारांना कर भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. अजून एक महिना मुदत वाढवून मिळेल का? यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी विलगीकरण दिवसाचा कालावधी कमी करा, कच्चा माल, उत्पादने ने-आण करण्यासाठी जिल्हांतर्गत वाहतूक सुरू करावी, मजुरांच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुरू करावी. कर्मचाऱ्यांच्या विम्याबाबतच्या समस्या सोडवाव्यात आणि पाणीपट्टी मूळ दराप्रमाणेच आकारावी, अशा मागण्या अन्य ठिकाणच्या कारखानदारांनी केल्या.
दरम्यान, यावेळी डोंबिवलीतील एमआयडीसीचे अधिकारीही वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.
नियमांचे पालन करण्याची दिली हमी
च्डोंबिवलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने अत्यावश्यक सेवेतील कंपन्यांमध्ये सध्या कर्मचारी येत नसल्याची माहिती या वेळी सोनी यांनी देसाई यांना दिली.
च्कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कारखानदार निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, मास्क, गरजेनुसार कोट तसेच सर्व नियामांचे पालन करतील, अशी हमी यावेळी उद्योजकांनी देसाई यांना दिली.