डोंबिवली एमआयडीसीतील कारखाने सुरू होणार कधी?; पुनश्च लॉकडाऊनमुळे फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:34 AM2020-07-02T03:34:29+5:302020-07-02T03:34:45+5:30
४१० कारखाने परवानगीच्या प्रतीक्षेत
मुरलीधर भवार
कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका डोंबिवली एमआयडीसीतील कारखान्यांना बसला आहे. ११ मेपासून काही मोजक्याच अत्यावश्यक वस्तू, औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे ४१० कंपन्यांंनी त्या सुरू करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, गुरुवारपासून पुन्हा होणाºया लॉकडाऊनमुळे या कंपन्यांची परवानगी लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, त्यामुळे कारखाने सुरू होणार तरी कधी?, असा सवाल केला जात आहे.
२४ मार्चपासून लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा तापला होता. राज्य सरकारने या कंपन्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. ३८ कंपन्या सेफ्टी आॅडिट न केल्यामुळे बंद केल्या होत्या. ५०पेक्षा जास्त कंपन्यांना २५ लाख ते एक कोटीपर्यंत दंडात्मक नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे कंपनी मालक व कामगारांनी आंदोलन केले. पुढे ते कोरोनामुळे त्यांनी मागे घेतले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद होत्या.
११ मे रोजी ४२० पैकी ६० कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली गेली. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कामगार गावी गेल्याने कारखानदारांना अपुºया मनुष्यबळाचा फटका बसला. तसेच गुजरात, मध्य प्रदेश व अन्य राज्यांतून कच्च माल येत नव्हता. त्यामुळे उत्पादन करता येत नव्हते. केवळ औषध उत्पादनाच्या कंपन्या सुरू होत्या. अनलॉक १मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील एक अधिकारी नेमून त्यांच्याकडून कंपनी सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ४१० कंपन्यांच्या मालकांनी कंपन्या सुरू करण्यास परवानगी मागितली होती. ही परवानगी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. मात्र, पुन्हा केडीएमसी हद्दीत गुरुवारपासून लॉकडाऊन होत असल्याने परवानगीची प्रक्रिया रखडणार असल्याचे कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले.
उद्योजक श्रीकांत जोशी म्हणाले, आता कुठे सुरळीत होत होते. लॉकडाऊनमुळे कच्च माल मागविण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच ज्या कंपन्या सुरू आहेत, त्यात कामगार वाहतूक साधनेअभावी कामावर येऊ शकणार नाहीत.