पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:20 AM2019-11-08T00:20:06+5:302019-11-08T00:20:28+5:30
भाजप गटनेत्याचा सवाल : साडेतीन कोटींचा निधी दोन दिवसांत तहसील कार्यालयास मिळणार
कल्याण : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अनेकांनी मदतीचे अर्ज करूनही त्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे या पूरग्रस्तांना सरकारी मदत मिळणार कधी, असा सवाल केडीएमसीतील भाजप गटनेते विकास म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले आहे.
कल्याण-डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला पुराचा फटका बसला होता. २६ जुलै, ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात तीन ते चार दिवस पाणी होते. सरकारने सुरुवातीला ज्यांच्या घरात किमान दोन दिवस पुराचे पाणी होते, तसेच ज्यांची घरे अधिकृत आहेत, अशा पूरग्रस्तांना किमान पाच हजारांची मदत दिली जाईल, असे परिपत्रक काढले होते. मात्र, पूरग्रस्तांनी सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लोकप्रतिनिधींनीही सरसकट मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर ही अट शिथिल केली गेली.
कल्याणच्या तहसीलदारांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे १६ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, हा निधी कल्याण तहसील कार्यालयास मिळाला. पूरग्रस्तांच्या थेट खात्यात भरपाईची रक्कम जमा केली गेली. मात्र, ज्यांना ही मदत मिळाली नाही, त्यांच्यासाठी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी तहसील कार्यालयाने आणखी १० कोटींची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. परंतु, ही रक्कम अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेली नसल्याने अनेकांना मदत मिळालेली नाही, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे अगोदर आलेली मदत किती जणांना दिली गेली आहे, अजून किती जणांना वाटप होणे बाकी आहे, असा सर्व तपशील त्यांनी तहसील कार्यालयाकडून मागितला आहे.
याप्रकरणी आकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, १६ कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांना देण्यात आली आहे. भरपाई न मिळालेल्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितला आहे. त्यापैकी साडेतीन कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसांत तहसील कार्यालयास मिळणार आहे. त्यानंतर निधीचे वाटप केले जाईल.
कल्याण पूर्वेतील नागरिकही मदतीपासून वंचित
च्कल्याण : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारकडून पंचनामे झाले, अर्जही भरून घेण्यात आले पण अद्याप कल्याण पूर्वेतील काहींना धनादेशाचे वाटप झालेले नाही. ती मदत तत्काळ मिळावी, यासंदर्भात माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश तरे यांनीही कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले आहे.
च्जुलै, आॅगस्टमधील अतिवृष्टीचा कल्याण पूर्व भागालाही मोठा फटका बसला होता. यात नागरिकांच्या घरातील सामानांसह शेतकऱ्यांचे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. सरकारतर्फे पूरग्रस्तांसाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. यानिमित्ताने नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे केले. नागरिक व शेतकºयांकडून अर्जही भरून घेण्यात आले. परंतु, खडेगोळवली, काटेमानिवली, शिवाजीनगर आणि वालधुनी भागातील काहींना अद्यापही १५ हजार रुपयांची मदत मिळालेली नसल्याचे तरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.