कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पालघरच्या ३१ हजारपैकी अवघ्या २० शेतक-यांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 07:14 PM2017-11-24T19:14:45+5:302017-11-24T19:14:56+5:30
राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.
सुरेश लोखंडे
ठाणे : राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या वेळी शेतकरी सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराना जाब विचारत असून यावरून चांगलेच वातावरण तापले आहे.
कर्जमाफीची घोषणा होऊन आणि त्यावरील श्रेय घेऊन काही महिने उलटले आहेत. मात्र, या रकमेपैकी देखील लाभ ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना झालेला नाही. दोन्ही जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांचे तीन मंत्री आणि १६ आमदार व ४ खासदार असतानाही शेतकºयांना त्याच्या या हक्काच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. याची मोठी किंमत आता ठाणे जिल्ह्यात जि.प. पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोजावी लागू शकते.
टीडीसीसी बँकेच्या १०१ शाखांपैकी ५९ शाखांमध्ये ३३ हजार ८८३ शेतकरी खातेदार आहेत. या शेतक-यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची सवलत असतानाही त्यांना आजपर्यंतही या रकमेचा लाभ मिळाला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यातही ३१ हजार २९ शेतकरी टीडीसीसीचे खातेदार आहेत. या खातेदारांपैकी आतापर्यंत केवळ २० शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. सुमारे आठ लाख ५७ हजार ९३५ रूपये रूपयांची रक्कम या शेतक-यांना वाटप करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मात्र अद्याप रक्कम आलेली नाही. पण आता लवकरच या रकमा बँकेत जमा होणार असून त्या त्त्वरीत शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केल्या जातील. यासाठी शासनाकडून सुमारे दोन - दोन हजार शेतक-यांच्या नावांची यादी मिळणार आहे. त्यातील योग्य लाभार्थ्यांची खात्री करून कर्जमाफीची रक्कम शासनाकडून मिळणार असल्याची टीडीसीसीचे उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे व सीईओ भागीरथ भोईर यांनी लोकमतला सांगितले.