स्कायवॉकवरील बाजार उठणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:41 PM2018-08-23T23:41:40+5:302018-08-23T23:42:05+5:30
रेल्वेस्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना आता पूर्वेतील स्कायवॉकवरही बिनदिक्कतपणे त्यांनी ठाण मांडले आहे.
डोंबिवली : रेल्वेस्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना आता पूर्वेतील स्कायवॉकवरही बिनदिक्कतपणे त्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकात येजा करणाऱ्या प्रवाशांना स्कायवॉकवर चालणे अवघड होत आहे. रात्रीच्या वेळी गर्दीमुळे येथे चेंगराचेंगरी होऊन एल्फिन्स्टनची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे यांच्या आदेशानुसार स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर जोमाने कारवाई सुरू असल्याचे चित्र रंगवले जात आहे. कारवाईसाठी पथक आले असतानाही त्याच परिसरात दाबेली, पाणीपुरी आणि मंच्युरियनविक्रेते खुलेआम व्यवसाय करत असल्याचे गुरुवारी सायंकाळी पाहावयास मिळाले. त्यामुळे कारवाई कशी सुरू आहे, याचा अनुभव स्वत: महापौरांनी घ्यावा, अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.
रेल्वेस्थानक परिसरातील गल्लीबोळ फेरीवाल्यांनी बळकावलेले असताना आता स्थानकाच्या पुलाला जोडणाºया स्कायवॉकवरही बिनधास्तपणे फेरीवाल्यांचा बाजार भरू लागला आहे. प्रारंभी रात्री उशिरा हा बाजार भरत असे. पण, आता दिवसाढवळ्याही तेथे अतिक्रमण होऊ लागले आहे. दोन्ही बाजूला फेरीवाले, भाजीपालाविक्रेते आणि वडापावविक्रेत्यांचा धंदा जोमात सुरू आहे. प्रवासी मोठ्या संख्येने या स्कायवॉकचा वापर करतात. सायंकाळी, रात्रीच्या वेळी कामावरून परतणाºया चाकरमान्यांची स्कायवॉकवर प्रचंड गर्दी होते. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे त्यांना पुलावरून वाट काढणेही कठीण होते.
रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला असताना एकूणच हे चित्र पाहता एक प्रकारे उच्च न्यायालयाचाही अवमान होत आहे. पण, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भिकाऱ्यांचा वावर
फेरीवाल्यांबरोबरच डोंबिवलीतील स्कायवॉकवर भिकाºयांचा वावर वाढला आहे. पूर्वेकडील भागात हे बकालतेचे चित्र पाहावयास मिळते. डोंबिवली पश्चिमेतील जोंधळे विद्यालयाकडे उतरणाºया पुलावरही भिकारी असतात, तर मच्छी मार्केट परिसरात उतरणाºया पुलावर शेड नसल्याने तेथे मात्र फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसत नाही. रेल्वेच्या पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. केडीएमसीने त्यांच्याकडून आदर्श घ्यावा, अशीही चर्चा सुरू आहे.
उद्धव यांच्या आदेशाला तिलांजली
स्कायवॉकच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्कायवॉकवर फेरीवाले बसणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश शिवसैनिकांना दिले होते. मात्र, स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशालाही तिलांजली दिल्याचे स्पष्ट होत आहे.