अभ्यास दौरे काढून नेत्यांची जनतेच्या पैशांवरील मौजमजा कधी थांबणार?, नागरिकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 01:50 PM2022-06-15T13:50:22+5:302022-06-15T13:50:47+5:30
अभ्यास दौऱ्यातून आजपर्यंत शहर व नागरिकांच्या हिताचे काय साध्य झाले, याचा लेखाजोखा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी दिला पाहिजे.
धीरज परब
मीरा राेड :
महापालिकेचे नगरसेवक हे विश्वस्त असतात. नागरिकांनी विश्वासाने त्यांना निवडून दिले असते. मात्र नगरसेवकांकडूनच जनतेचा विश्वासघात होत आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवक आणि काही अधिकारी पालिका ओरबाडून खात आहेत. त्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटन सुरू आहे. लाखो रुपयांची उधळपट्टी नगरसेवक-अधिकारी करतात, त्यांनी करदात्यांच्या पैशाची आपण उधळपट्टी करीत असल्याचे भान ठेवले पाहिजे. शहराच्या विकासासाठी दिलेला हा निधी मौजमजा करायला नाही.
मीरा-भाईंदर महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. कायम व कंत्राटी कामगारांमुळे आस्थापनेचा खर्च प्रचंड वाढला आहे. पदाधिकारी-अधिकारी यांची आलिशान दालने व आदरातिथ्य, अनावश्यक व मनमानीपणे काढली जाणारी कंत्राटे आदींवर कोट्यवधींचा खर्च सुरू आहे. नागरिकांना मालमत्ता करात सवलत देण्याची मागणी झाली की हेच अधिकारी व नगरसेवक पालिकेकडे पैसे नाहीत म्हणून हात आखडता घेतात.
वृक्ष प्राधिकरण समितीच्या मेघालय दौऱ्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. याआधी नगरसेवक-अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली काश्मीर, हिमाचल, नैनिताल, केरळ, कुर्ग, राजस्थान, गोवा, सिक्कीम, म्हैसूर अशा पर्यटनस्थळांना अभ्यासाच्या नावाखाली भेटी दिल्या आहेत. दौऱ्यातील मौजमजेची छायाचित्रे व किस्सेसुद्धा गाजले आहेत. आलिशान हॉटेल, विमान प्रवास, खान-पान व मौजमजा जनतेच्या पैशांवर सुरू आहे.
अभ्यास दौऱ्यातून आजपर्यंत शहर व नागरिकांच्या हिताचे काय साध्य झाले, याचा लेखाजोखा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी दिला पाहिजे. दौऱ्याचे प्रत्येक दिवसनिहाय छायाचित्रांसह स्थळ भेटी वा बैठकांचे अहवाल आजपर्यंत सादर झालेले नाहीत. शहरात झाडे व कांदळवनाची कत्तल केली जात असताना, त्याच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका न घेणारे नगरसेवक-अधिकारी यांना राज्यातील कृषी केंद्र, रोपवाटिका व प्रकल्पांचा अभ्यास करण्याची गरज वाटत नाही. हे अभ्यास दौरे म्हणजे जनतेच्या जीवावर चालवलेली चंगळ आहे.