पार्किंगचे धोरण फाइलीतून रस्त्यावर उतरणार तरी कधी? दीड वर्षापूर्वीच ठराव मंजूर
By अजित मांडके | Published: January 9, 2024 09:26 AM2024-01-09T09:26:39+5:302024-01-09T09:27:01+5:30
ठराव अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेल्या दहा वर्षांपासून ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण कागदावर आहे. दीड वर्षापूर्वी महासभेत मंजूर झालेला ठराव अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही. ठाणे महापालिकेने कापूरबावडी, माजिवडा येथील पुलाखाली आणि वागळे इस्टेट येथील रस्त्यावर पार्किंग सुरू करण्यासाठी निविदा काढल्या आहेत, परंतु पुलाखालील पार्किंगला एका वकिलाने विरोध करून पालिकेला नोटिसा धाडल्या आहेत. त्यामुळे धोरण निश्चित नसल्याने, शहरात कुठेही कशाही पद्धतीने वाहने उभी केली जातात.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून कागदावर असलेले रस्त्यावरील स्मार्ट पार्किंग धोरण गुंडाळत त्याऐवजी परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सशुल्क पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यानुसार, शहरातील १६८ रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामध्ये ६,४७७ दुचाकी, १,५४६ तीनचाकी, ३,३६० हलकी चारचाकी, ५४८ अवजड चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या पार्किंगसाठी अ, ब, क, ड अशी रस्त्यांची वर्गवारी करून, त्याप्रमाणे वाहन पार्किंग शुल्काचे दर निश्चित केले आहेत.
या प्रस्तावामुळे ठाणेकरांना वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले होते. हा प्रस्ताव दीड वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता.
वकिलाची नोटीस
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता कापूरबावडी आणि माजिवडा उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करण्यासाठी निविदा काढली आहे, तसेच वागळे इस्टेट भागातील रोड नं. २२ येथेही पार्किंगसाठी निविदा काढली. वागळे इस्टेटला काही अडचण नसली, तरी माजिवडा आणि कापूरबावडी उड्डाणपुलाखाली होणाऱ्या पार्किंगच्या विरोधात एका वकिलाने महापालिकेच्या संबंधित विभागाला नोटीस धाडल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रशासकीय कारभार सुरू असताना इतर कामांसोबत पार्किंग धोरणाचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, यात पालिका अधिकारी स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांची उदासीनता दिसत आहे. पार्किंग प्लाझा उभारायचा ठराव असता, तर तो लगेच मंजूर झाला असता.
-नरेश म्हस्के, माजी महापौर, ठामपा.
पार्किंगबाबत काही नवीन पर्याय शोधण्याचा विचार सुरू आहे. कापूरबावडी, माजिवडा, वागळे इस्टेट येथील पार्किंग संबंधी निविदा काढण्यात आल्या आहेत, परंतु पुलाखालील पार्किंगला विरोध होत असेल, तर त्याला विधि विभागामार्फत योग्य ते उत्तर दिले जाईल, शिवाय सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंग व्यवस्था मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
- अभिजित बांगर, आयुक्त, ठामपा.