उल्हासनगर महापालिका रुग्णालयाचे लोकार्पण कधी?, मुख्यमंत्री शिंदे बुधवारी शहरात
By सदानंद नाईक | Published: February 13, 2023 06:44 PM2023-02-13T18:44:48+5:302023-02-13T18:44:56+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री शहरात येणार असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उदघाटन व काही मशीनचे लोकार्पण होणार आहे.
उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री शहरात येणार असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उदघाटन व काही मशीनचे लोकार्पण होणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षा पासून उदघाटनसाठी सज्ज असलेल्या महापालिका रुग्णालयाचे लोकार्पण कधी? असा प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे.
उल्हासनगरातील विविध विकास कामाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी रात्री होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची शहराला पहिलीच भेट आहे. त्यानिमित्ताने त्यांचें समर्थक व पक्षाचे पदाधिकारी शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात शहरातील अवैध बांधकामे नियमित करणे व धोकादायक इमारतीचा प्रश्न त्यांनी निकाली काढून नागरिकांना दिलासा दिला. त्याबाबत जीआर काढल्याची माहिती आमदार बालाजी किणीकर यांनी शहरवासीयांना दिली आहे. बुधवारी रात्री ८ वाजता सी ब्लॉक येथील संच्युरी कंपनीच्या ग्राऊंडवर स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वीपिंग मशीन, स्ट्रीट लाईट गाडी, सेक्शन मशीन आदीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर, श्वान निर्बिजीकरण केंद्र, शासकीय वाहनासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन, खडेगोलावली येथिल मलनिस्सारण केंद्र, दिव्यानं व्यक्तीची ऑनलाईन सॉफ्टवेअर, प्लास्टिक क्रॅशर आदीचे उदघाटन होणार आहे. आदींची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरात येणार असल्याने, अनेक रस्त्याची दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले असून सीब्लॉक संच्युरी मैदान येथील काही अवैध बांधकामावर कारवाई करण्यात आली. तसेच साफसफाई, चकाचक रस्ते, आदीकडे महापालिका अधिकारी लक्ष देत आहेत. एकूणच शहराचे रुपडे पालटले आहे. मात्र कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेने रिजेन्सी अंटेलिया येथे बांधण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण यावेळी होत नसल्याने, विरोधी पक्षांनी नाराजी दाखविली आहे. रुग्णालयातील कोट्यवधींची मशीन, साहित्य भंगारात गेल्यावर रुग्णालयाचे लोकार्पण होणार का? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. महापालिकेचे स्वतःचे रुग्णलाय नसल्याने, आरोग्य सुविधेबाबत शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. रिजेन्सी-अंटेलिया येथे बांधण्यात आलेले रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यास, हजारो नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार आहे. असेही बोलले जात आहे.