डोंबिवलीतील नगरविकासाची कामे पूर्ण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:31+5:302021-06-03T04:28:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहरांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र, दोन वर्षे या ...

When will the urban development works in Dombivali be completed? | डोंबिवलीतील नगरविकासाची कामे पूर्ण कधी करणार?

डोंबिवलीतील नगरविकासाची कामे पूर्ण कधी करणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहरांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र, दोन वर्षे या खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केडीएमसीशी संबंधित विषय अजूनही प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविकपणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या शहरांनी आपल्याला व आपल्या पक्षाला २५ वर्षे एकहाती सत्ता दिली. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आपले कर्तव्य ठरते, असा टोला डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला.

व्यस्त कार्यभारामुळे केडीएमसी हद्दीतील प्रश्नांकडे शिंदे यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरविकास खात्यांतर्गत मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचे चव्हाण म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी अपूर्ण प्रकल्पांच्या कामांची जंत्रीच मांडली.

सुतिकागृहाच्या पुनर्विकासाला २१ ऑक्टोबर २०१४ ला चालना मिळाली. मनपाच्या महासभेत २० नोव्हेंबर २०१६ ला ठराव झाला. चारवेळा स्वारस्य देकार काढले. अखेर २५ फेब्रुवारी २०२० ला एकच स्वारस्य देकार आला. रुबी हेल्थकेअर व आशर बिल्डर्स यांचा ९ नोव्हेंबर २०२० ला देकार देण्यात आला. परंतु, सुतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार?, असा सवाल चव्हाण यांनी केला.

मोठागाव-माणकोली पुलाच्या बांधकामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विशेषाधिकारात २२३ कोटींचा निधी दिला होता. या पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार? कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरण व विस्तारासाठी ७७३ कोटींच्या निधीला मंजुरी दिला होती. मग अजूनही ते काम का पूर्ण होत नाही? राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या केडीएमसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या रिंगरोडच्या दुर्गाडी- मोठागाव-हेदुटणे मार्गाचे काम कधी होणार? महत्त्वाकांक्षी ऐरोली-काटई भुयारी व उन्नत मार्गाचे काम फडणवीसांच्या हस्ते सुरू झाले. या कामासाठी त्यांनीच ९४४ कोटींचा निधी मंजूर केला. या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.

ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या जोशी हायस्कूलकडे उतरणाऱ्या मार्गाचे लोकार्पण आपल्याच हस्ते झाले. तर, ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यापर्यंत उन्नत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाला ३० कोटी निधी कधी मंजूर करणार? मोठागाव रेल्वे क्रॉसिंगच्या डीएफसीसी पुलाच्या ५० कोटींच्या खर्चापैकी २५ कोटींचा भार एमएमआरडीएने उचलण्याबाबतचा प्रश्न कोण सोडवणार? कल्याण तालुक्यासाठी महत्त्वाचे असलेल्या टिटवाळ्यातील मेडिकल कॉलेजसाठी जागा अधिग्रहित करण्याचे काम कधी करणार, असे सवालही चव्हाण यांनी केले.

मेट्रो मार्गाचा विसर पडला का?

कल्याण-तळोजादरम्यानच्या चार हजार ७३८ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो १२ प्रकल्पाचा सरकारला विसर तर पडला नाही ना? तसेच आठ हजार ४१६ कोटी खर्चाच्या मेट्रो ५ म्हणजेच भिवंडी-कल्याण मेट्रोचे काम प्रगतिपथावर कधी येणार? एमएमआरडीएच्या माध्यमातून ४७२ कोटींच्या निधीतून केडीएमसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे काम दीड वर्षांपासून प्रलंबित का ठेवले आहे?, असे प्रश्नही यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केले.

-----------

Web Title: When will the urban development works in Dombivali be completed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.