‘जागो ग्राहक जागो’ कधी होणार?
By admin | Published: December 24, 2015 01:41 AM2015-12-24T01:41:38+5:302015-12-24T01:41:38+5:30
ठाणे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही ग्राहक राजा झोपेतून जागा होण्याचे नाव घेत नाही,
भाग्यश्री प्रधान, ठाणे
ठाणे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही ग्राहक राजा झोपेतून जागा होण्याचे नाव घेत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे. २०१५ या वर्षात ११५२ ग्राहकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. त्यापैकी ९५० तक्रारींमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा न्याय मिळाला. मात्र एकूण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण बरेच नगण्य असल्याने जागो ग्राहक जागो हे ठाणेकरांच्या कधी काना-मनात शिरणार, असा सवाल ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत.
ठाणे ग्राहक तक्रार निवारण मंचाची १९९१ मध्ये स्थापना करण्यात आली. गेल्या २४ वर्षांत त्यांच्याकडे १५ हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यामधील बहुतांश तक्रारदारांना दिलासा लाभला. गतवर्षीच्या तक्रारींच्या तुलनेत २०१५ या वर्षभरात नोंदवलेल्या व सोडवलेल्या तक्रारी तुलनेने कमी आहेत. सध्या बिस्कीटाच्या पुड्यात कमी वजनाची बिस्कीटे भरून ग्राहकांची दिशाभूल करण्यापासून महागडे फ्लॅट विकतांना घर खरेदीदाराला गंडवण्यापर्यंत अनेक प्रकार आजूबाजूला घडतात. मात्र तरीही फसवणूक झालेले ग्राहक त्याविरुद्ध दाद मागत नाहीत. ज्याने फसवणूक केली त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणे, फसवणूक करणारा प्रभावशाली व्यावसायिक, उद्योजक अथवा बिल्डर असेल तर त्याच्या विरोधात संघटीतपणे तक्रार करून लढा देणे असे प्रकार करण्यास ग्राहक धजावत नाही. बरेचदा दुर्लक्ष करणे किंवा जे पदरात पडेल ते स्वीकारणे अशी बोटचेपी भूमिका ग्राहक घेतो. त्यामुळे ग्राहकांना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जास्तीत जास्त तक्रारी पोहचाव्या, असे आवाहन गुरुवार २४ डिसेंबर रोजीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त करण्यात येत आहे.
ग्राहकांच्या हितरक्षणाकरिता १९८६ सालापासून राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा केला जातो. एखादी कंपनी जर मालाचा उत्तम दर्जा न राखता, केवळ आकर्षक मार्केटींग करून पुरवठा करीत असेल तर त्याची खरेदी ग्राहकांनी करु नये. तसेच अशा फसवणुकीविरुद्ध तक्रार दाखल करावी हाच ग्राहक दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. ग्राहकाकडून पैसे घेऊन काहीवेळा दुकानदार फरार होतात किंवा ग्राहकाची फसवणूक करुन त्याच्याकडून जास्त पैसे उकळले, असे जाणवले तरीही ग्राहक तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकांनी सर्व पुराव्यानिशी तक्रार निवारण न्यायालयात हजर राहणे मात्र गरजेचे असते. मात्र अनेकजण तक्रार नोंदवूनही सुनावणीच्यावेळी न्यायलयात हजर राहत नाहीत. अशा प्रकरणात तक्रारीत सकृतदर्शनी कितीही तथ्य आढळले तरी तक्रारीचा निकाल देणे कठीण जाते, असे ग्राहक मंचातर्फे सांगण्यात आले.