उर्वरित २०० मंडळांच्या परवानग्या अडल्या कुठे? पालिका उपायुक्तांनी केली गणेशोत्सव समितीशी चर्चा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 12, 2023 06:35 PM2023-09-12T18:35:03+5:302023-09-12T18:35:17+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व मंडळांची बैठक बोलवली होती.
ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व मंडळांची बैठक बोलवली होती. यात २८० पैकी ८० मंडळांना परवानग्या मिळाल्या आहेत. २०० मंडळांच्या परवानग्या कुठे अडल्या आहेत याची माहिती उपायुक्तांनी घेतली. यावर गणेशोत्सव समन्वय समितीशी सविस्तर चर्चा करुन पालिकेने सकारात्मक प्रतिसाद समितीला दिली आहे.
दरवर्षी मंडळांना परवानगी मागण्यापेक्षा सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी मिळावी हा महत्त्वाचा मुद्दा समितीने मांडला असता त्याचे नियोजन पुढच्यावर्षीपासून करण्याचा प्रयत्न असेल असे पालिकेने आश्वासित केले आहे. शासनाचा जीआर निघाला नाही तर मंडळांकडून प्रतिज्ञापत्रे घेऊन त्यांवा पाच वर्षांची परवानगी दिली जाईल असे पालिका प्रशासनाने सांगितले. उपायुक्त जी. जी गोदापुरे यांनी गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक त्यांच्या दालनात बोलविली होती. यावेळी अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही त्यामागचे कारण जाणून घेऊन अग्निरोधक यंत्र मिळण्याबाबत गणेशोत्सव मंडळांना संपर्क क्रमांक देऊन ते घेतल्यावर तिथल्या तिथेच अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिली.
वागळे इस्टेट क्रमांक १६ येथे टाकण्यात आलेल्या दुभाजकामुळे गणेश आगमन आणि विसर्जनात अडथळा निर्माण होऊ शकतो, तो हटविण्यात यावा, ओव्हरहेड वायरमुळे मुर्तींचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महावितरण विभागाला त्या तात्काळ हटविण्यात येण्याची, मंडपांच्या आजूबाजूला धुळखात पडलेले वाहने, गणेशभक्तांची दर्शनासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी हातगाड्या हटविण्याची सूचना करावी, विसर्जन घाटावर गणेशाचे विसर्जन करताना मुर्ती तुटतात, त्या मागचे अडथळे दूर करावे अशी मागणी समितीने केली असता उपायुक्तांनी यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल असे आश्वासन समितीला दिले. यावेळी समितीचे अध्यक्ष समीर सावंत, उपाध्यक्ष रविंद्र पालव उपस्थित होते.