दाऊदचा फोन येतो, पण तो कुठेय कळत नाही; इक्बाल कासकरची ठाणे कोर्टात माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:41 AM2018-03-07T04:41:59+5:302018-03-07T11:47:32+5:30
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी अटक केलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी ठाणे न्यायालयाने मंगळवारी संवाद साधला.
ठाणे - खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी अटक केलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी ठाणे न्यायालयाने मंगळवारी संवाद साधला. दाऊद इब्राहिम कुठे आहे, अशी विचारणा करून तपासकामी पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने इक्बालला दिले. गोराई येथील ३८ एकर जागेच्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकाकडून इक्बाल कासकरने
दोन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३ आॅक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी रा.वि. ताम्हडेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करताना, तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने इक्बालला दिले. पोलीस कोठडीसाठी युक्तिवाद सुरू असताना, तुम्हाला भीती वाटत नाही का, अशी विचारणा न्यायालयाने इक्बाल कासकरला केली. तुमच्या कुटुंबातील सदस्य परदेशात कुठे आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का, असा प्रश्न न्यायालयाने त्याला केला. त्यावर मला माहीत नाही, असे इक्बालने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, दाऊद इब्राहिम कुठे आहे, असे न्यायालयाने त्याला विचारले. त्यावरही मला माहीत नसल्याचे इक्बालने न्यायालयाला सांगितले.
न्यायालय आणि इक्बालमध्ये अनौपचारिक संवाद सुरू असतानाच, इक्बालचे वकील श्याम केसवानी यांनी मध्यस्थी केली. दाऊद
इब्राहिमला भारतात परत यायचे होते. त्याने ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या मध्यस्थीने सरकारला तसा प्रस्तावही दिला होता. मात्र, आपणास मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातच ठेवावे, अशी अट त्याने घातली होती. सरकारने त्याची ही अट मान्य केली नाही. इक्बाल कासकर दुबईहून भारतात आल्यानंतर आपण स्वत: त्याला न्यायालयासमोर घेऊन आलो होतो. आपण दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे, असे त्याने स्वत:हून सांगितल्यानंतर इक्बालची ओळख यंत्रणेला कळली होती, याचे स्मरण अॅड. केसवानी यांनी न्यायालयाला
करून दिले.
दाऊदशी फोनवर बोलणे होते
दाऊद इब्राहिमशी कधी बोलणे होते का, अशी विचारणा न्यायालयाने इक्बाल कासकरला केली. इक्बालने त्यावर होकारार्थी उत्तर दिले. दाऊदशी फोनवर बोलणे होते. मात्र, त्याचा फोन येतो तेव्हा मोबाइलवर नंबर दिसत नाही, असे इक्बालने न्यायालयासमोर सांगितले.
वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेश
इक्बाल कासकरला मधुमेह असून त्याच्या पायाला जखमही झाली आहे. त्याला योग्य ते वैद्यकीय उपचार पुरवण्याची विनंती अॅड. केसवानी यांनी यावेळी न्यायालयाला केली. त्यावर इक्बालवर ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश न्यायालयाने खंडणीविरोधी पथकास दिले.