शौचालये दुरुस्तीचे पैसे गेले कुठे? मनसेचा प्रश्न; उल्हासनगर शौचालय दुरावस्थेच्या निषेधार्थ मनसेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 05:16 PM2021-12-14T17:16:10+5:302021-12-14T17:16:19+5:30
उल्हासनगर खेमानी परिसरातील प्रभाग क्रं-७ मध्ये दार विना शौचालयाचा प्रश्न गेल्या महिन्यात प्रवीण माळवे यांनी लावून धरल्यावर, शहरातील शौचालयाची दुरावस्था उघड झाली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ संतोषनगर मधील शौचालयासह नाली व पायवाटा यांची दुरावस्था झाल्याच्या निषेधार्थ मनसेचे पदाधिकारी रवी बागुल उपोषणाला बसले. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी एकजुटले असून शौचालयाच्या दुरुस्तीसह पायवाट व नाली दुरुस्तीचा निधी गेला कुठे? असा प्रश्न मनसेने महापालिका बांधकाम विभागालव केला आहे.
उल्हासनगर खेमानी परिसरातील प्रभाग क्रं-७ मध्ये दार विना शौचालयाचा प्रश्न गेल्या महिन्यात प्रवीण माळवे यांनी लावून धरल्यावर, शहरातील शौचालयाची दुरावस्था उघड झाली. महापालिकेने शौचालय दुरुस्तीचे काम ठेकेदाराला देऊन विशेष निधीची तरतूद केली. मात्र शौचालय दुरुस्ती होत नसतील तर दुरुस्तीचा निधी गेला कुठे? असा प्रश्न शहर मनसेकडून विचारला जात आहे. कॅम्प नं-४ मधील प्रभाग क्रं-१५ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथून सेनेचे धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, शीतल बोडारे व सपकाळे नगरसेवक पदी निवडून आले. प्रभाग स्वच्छ व सुंदर असून रस्ते, नाल्यासह इतर विकासकामे झाले आहेत. मात्र संतोषनगर येथील शौचालय, नाल्या व पायवाटेचे काम बाकी आहे. शौचालयाच्या दुरावस्था बाबत पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने मनसेचे पदाधिकारी रवी बागुल हे समर्थकासह सोमवार पासून उपोषणाला बसले.
मनसेच्या उपोषणाने पुन्हा शहरातील शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका दरवर्षी नाले दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती पायवाटा बांधणे यावर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र कोट्यवधीचा खर्च करूनही नाले, शौचालय, पायवाटा यांची दुरावस्था कायम कशी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले. नगरसेवकाला दरवर्षी नगरसेवक व प्रभाग निधी असा एकून १६ लाखाचा निधी मिळतो. बहुतांश नगरसेवक नाले बांधणी, पायवाट बांधणे, शौचालय दुरुस्ती यांच्यावरच निधी खर्च करीत असून यावर्षी नगरसेवकांच्या १२ कोटीच्या निधीतूनही हीच कामे असल्याचे उघड झाले. महापालिकेने शहरातील शौचालयाची दुरुस्ती करावी, अन्यथा मनसे शहरभर आंदोलन करेल. असा इशारा शहाराध्यक्ष बंडू देशमुख व शहर संघटक मौनुद्दीन शेख यांनी दिला.