50 कुठं आणि 105 कुठं? कल्याणनंतर भाजपाने उल्हासनगरातून शिंदेंना डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:06 PM2023-06-15T15:06:16+5:302023-06-15T15:06:45+5:30
कल्याणध्ये काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंना म्हणजेच शिवसेनेला लोकसभेला मदत करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील मंत्र्यांसमोरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.
महाविकास आघाडीतील जागा वाटपावरील वाद-प्रतिवाद संपल्याचे दिसत नाहीत तोच आता शिंदे गट आणि भाजपात लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपावरून कलगीतुला रंगला आहे. त्यातच फडणवीसांपेक्षा शिंदेंची लोकप्रियता अधिकच्या जाहिरातीने त्यात तेल ओतण्याचे काम केले आहे. यामुळे आता शिवसेना आणि भाजपाचे नेते एकमेकांना 'पायरी' दाखविण्यास उतावळे झाले आहेत.
कल्याणध्ये काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंना म्हणजेच शिवसेनेला लोकसभेला मदत करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील मंत्र्यांसमोरच भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. आता तो मतदारसंघ शिंदे कुटुंबाचा असल्याने राज्यभर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातच शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे सुरु होते. त्यात शिंदे गटाच्या जाहिरातबाजीने हे अंतर फारच वाढले होते.
कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीसांनी अचानक कानाचे कारण देत अनुपस्थिती लावल्याने या नाराजीला उधाण आले होते. त्यातच दुसऱ्या दिवशी बावनकुळेंनी जाहिरातीवरून धुसफुस झाल्याचे मान्य केले. यानंतरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीय. शिंदे गटाच्या एका नेत्याने आमचे ५० आले म्हणूनच सरकार भाजप सरकारमध्ये आले असे वक्तव्य केले आहे. यावरून उल्हासनगरात आता रातोरात बॅनर लागला आहे.
50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है! असे लिहिलेला बॅनर उल्हासनगरात लावण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोटोखाली किंगमेकर असे लिहिण्यात आले आहे. यावरून शिंदेंना त्यांच्याच मतदारसंघात डिवचण्याची भाजपा नेत्यांनी रणनिती दिसत आहे.