आमच्या हक्काचे पाणी मुरतेय कुठे? हे शोधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 03:28 AM2019-01-12T03:28:44+5:302019-01-12T03:29:04+5:30
महिलांचा सवाल : डोंबिवलीमधील म्हात्रेनगरमध्ये पाणीप्रश्न बनला गंभीर
अनिकेत घमंडी
डोंबिवली : लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार केडीएमसीने सप्टेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. मात्र, २० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय, याचा शोध घ्या. भरमसाट मालमत्ताकर, पाणीबिले घेता तरीही आमच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्याला जबाबदार कोण, असा सवाल म्हात्रेनगर प्रभागातील त्रस्त महिलांनी ‘लोकमत’कडे केला. महापालिका अधिकाऱ्यांनी आधी पाणी द्यावे, मग बुस्टरवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
म्हात्रेनगरमध्ये १९९९ पासून पाणीसमस्या भेडसावत आहे. या प्रभागातील मारुती, आकृती, जागृती, बिंगो प्रसाद, कचरू भवन, सद्गुरू सेवासदन, सुदामा, अमरीश, अरुण, ओमधारा, अवंतिका, गणेश कृपा, बसवेश्वर, अमोलदीप आदी सोसायट्यांतील रहिवासी पाणी मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. पाण्याचा दाब अत्यंत कमी असतो. जमिनीपासून फुटावर नळ असतानाही बादली भरत नाही. काही इमारतींत जेमतेम अर्धा तास पाणी येते. त्यातही तिसºया-चौथ्या मजल्यावर पाणीच येत नाही. त्यामुळे अनेकदा टँकर मागवावा लागतो. एका टँकरसाठी दोन हजार रुपये लागतात. महागाईमुळे टँकर मागवणेही परवडत नाही. टँकरमुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी येतात-जातात, पण हा प्रश्न काही सुटत नाही. मग कर का भरायचे, असा प्रश्न रसिका जोशी, मेघा पाटील, मेघा चोरगे, सुमंगला नायर, वैशाली भोसले, मीनल टीकम, मानसी चोरगे, रश्मी खेंगरे आदी महिलांनी विचारला.
पाण्याअभावी नातेवाइकांना घरी बोलावता येत नाही. तर घरांत कलहही वाढले आहेत. शेजाºयांशीही खटके उडतात. पाणी वापरताना काटकसर करावी लागत आहे. अनेकदा कागदी प्लेट, ग्लासचा वापर करावा लागत आहे, अशी व्यथा महिलांनी मांडली. २०१२ पासून पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. २०१६ मधील दुष्काळाच्या वेळी आठवडाआठवडा पाणी मिळाले नव्हते. यंदाही तशी स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे महिला म्हणाल्या.
आयरे येथील दोनपैकी एका जलकुंभातून थेट पाणीपुरवठा केला जात असल्याचा महापालिकेच्या अधिकाºयांचा दावा आहे. त्यासाठी एक एमएलडीची तरतूद आहे. पण, प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. ते मुरतंय कुठे? पाणी चोरणाºयांचा शोध घेण्याची आमची मागणी आहे. मात्र, महापालिका तो घेत नाही, अशी टीका महिलांनी केली.
म्हात्रेनगर प्रभागात १७ लाख रुपये खर्चून नवी पाण्याची लाइन टाकण्याची वर्कआॅर्डर मंजूर झाली आहे. पण, ती टाकून काही उपयोग नाही. त्यासाठी आधी तीन तास चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.
- मुकुंद पेडणेकर, नगरसेवक
म्हात्रेनगरमध्ये काही ठिकाणी पाणीसमस्या आहे. ती लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी काही तांत्रिक बदल, क्रॉस कनेक्शन करणे आवश्यक आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे. कनिष्ठ अभियंत्यांना तशा सूचना दिल्या आहेत. एका जलकुंभातून तेथे सुरळीतपणे पाणीपुरवठा होत आहे.
- राजीव पाठक, अभियंता,
पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी