भार्इंदरमध्ये खेळायचे कुठे? हाच प्रश्न आहे!
By Admin | Published: January 23, 2017 05:16 AM2017-01-23T05:16:07+5:302017-01-23T05:16:07+5:30
मीरा-भार्इंदरमध्ये खेळाडूंची, क्रीडा रसिकांची कमतरता नसली, तरी क्रीडाक्षेत्र फुलण्यासाठी पायाभूत सुविधा आणि त्या पुरवण्यासाठी
मीरा-भार्इंदरमध्ये खेळाडूंची, क्रीडा रसिकांची कमतरता नसली, तरी क्रीडाक्षेत्र फुलण्यासाठी पायाभूत सुविधा आणि त्या पुरवण्यासाठी प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने क्रीडासंस्कृतीचे मरण ओढवते आहे. क्रीडा स्पर्धांचे नियमित आयोजन असो, की प्रशिक्षण त्याबाबत उदासीनताच दिसून येते. पालिकेने खासदार निधीतुन उभे केलेले क्रीडा संकुल गेल्या अडीच वर्षांपासून धुळ खात पडले आहे, हेच त्याचे उत्तम उदाहरण आहे. मीरा-भाईंदरमध्ये अनेक खेळाडू घडत असले, तरी त्यांच्या क्रीडा विस्तार व विकासासाठी पुरेशी व्यवस्था शहरात उपलब्ध नाही. त्यांचे स्वत:चे परिश्रम आणि खाजगी सुविधांच्या बळावर ही क्रीडासंस्कृती फुलते आहे. खाजगी जागांवर मर्यादित सोय असली, तरी तुटपुंज्या मैदानांचाच आधार क्रीडापटूंना घ्यावा लागतो. खेळासाठी राखीव मैदानावरही राजकीय डोळा असल्याने त्यांचाही वापर होऊ दिला जात नाही, हे खेळाडूंचे दुर्दैव.
माजी खासदार संजीव नाईक यांच्या खासदार निधीतून भार्इंदर पूर्वेकडील नागरी सुविधा भूखंडावर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधण्याच्या प्रस्तावावर २० एप्रिल २०११ च्या महासभेत मंजुरी देण्यात आली. त्याचे भूमिपूजन १३ मे २०१२ ला तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले. २१ कोटी ३५ लाख खर्चाच्या तीन टप्प्यांतील या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचा लोकार्पण सोहळा २३ फेब्रुवारी २०१४ ला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यासाठी सुमारे साडेपंधरा कोटी रुपये खर्च करण्यात आले. ते सुरु करण्यासाठी आवश्यक धोरण नुकतेच तयार करण्यात आले असले, तरी त्याची निविदा प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव लांबणीवर पडली आहे. त्यातच तीन टप्प्यातील क्रीडा संकुल पुरेशा निधीअभावी एकाच टप्प्यावर विसावले आहे आणि सध्या ते अडीच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.
पालिका हद्दीतील पश्चिम महामार्गावर लोढा बिल्डर्सचा भव्य गृहप्रकल्प बांधण्यात आला आहे. त्याच्या बांधकामापोटी पालिकेला सुमारे तीन हजार चौरस मीटर जागा नागरी सुविधा भूखंडाच्या माध्यमातून प्राप्त झाली. परंतु ही जागा पालिकेने हस्तांतरीत करुन न घेता ती बिल्डरच्याच खाजगी शाळेला बीओटी तत्वावर दिली. त्यापोटी महिन्याकाठी अल्प भाडे निश्चित करण्यात आले. त्याला तत्कालीन महासभेने मान्यताही दिली. त्यामुळे पालिकेच्या हक्काची जागा पुन्हा बिल्डरच्या घशात घातली गेली. ही जागा शहरातील खेळाडूंसाठी उपयोगात आणण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यावर जागतिक दर्जाचा तरणतलाव बांधण्याची सूचना पालिकेला केली. त्यामुळे तत्कालीन महासभेने त्या जागेवर केलेला खाजगी शाळेचा ठराव रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे त्यांनी पाठपुरावा केला. त्यावर सरकारने ही जागा महापालिकेला दिल्यास ती नागरी हेतूसाठी उपयोगात आणता येईल, असा अभिप्राय देत तसा ठराव महासभेने मंजूर करुन सरकारला सादर करण्याचे निर्देश पालिकेला दिले. तत्कालिन महासभेने ठराव मंजूर करुन तो सरकारकडे पाठविला. त्यावर सरकारने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नियोजित तरणतलाव अनिश्चिततेच्या गटांगळ््या खातो आहे.
तत्पूर्वी शहरात तरणतलावाचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता. आजतागायत तो कागदावरच आहे. स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्येसुद्धा तरणतलावाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असली, तरी ते अद्याप सुरु झाले नसल्याने त्यात डासांची उत्पत्ती फक्त होते आहे.
पालिकेने २००९ मध्ये शहरातील खेळाडुंसाठी महापौर चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात मॅरेथॉनचा समावेश करण्यात आला होता. यानंतर तब्बल सात वर्षांनी म्हणजे २०१६ मध्ये महापौर चषकाचे आयोजन करण्यात आले. त्यात केवळ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला. त्यामुळे शिक्षणबाह्य खेळाडू त्यापासून वंचित राहिले. यासाठी पालिकेने सुमारे ७५ लाखांची तरतुद केली होती. यंदा म्हणजे २०१७ मध्येही ही त्याचे आयोजन होणार आहे. यंदा मात्र त्यात महिला व ज्येष्ठ नागरीकांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा इतर खेळाडुंना त्यात कसब दाखविण्याची संधी मिळण्याची शक्यता मावळली आहे.
मीरा रोड येथील शांतीनगर सेक्टर नऊमधील पालिकेच्या लोकमान्य टिळक उद्यानात स्थानिक माजी रणजीपटू शाबाद खान हे परिसरातील मुलांना क्रिकेटचे मोफत प्रशिक्षण देत होते. त्यातही राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्याने पालिकेने अखेर ते बंद पाडले आहे. काही गृहसंकुलात नागरी सुविधा भुखंड अस्तित्वात असले तरी ते बेकायदा बांधकामाच्या विळख्यात सापडले आहेत. याचे उदाहरण म्हणजे शांतीस्टार बिल्डरने शांतीनगर मधील सुविधा भूखंडावर केलेले बेकायदा बांधकाम. सध्या ते न्यायप्रविष्ट असुन राज्य सरकारनेही त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शहरातील काही सामाजिक तसेच राजकीय पक्षांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेखेरीज इतर स्पर्धांचे आयोजनही केले जात नाही. यातूनच त्यांचे क्रीडादारिद्र्य लक्षात यावे. माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी गेल्या वर्षी प्रथमच १४ वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळला. परिसरातील १२८ संघांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शंकर नारायण महाविद्यालयाकडून शहरासह आसपासच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी पावसाळी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. ते पाहता शहरात खेळाडू आहेत हे दिसून येते, पण अभाव आहे तो क्रीडासंस्कृतीचा.
केवळ नियोजन व आयोजनाअभावी सरसकट सर्व खेळाडूंना क्रीडांस्पर्धांपासून, क्रीडा सुविधांपासून वंचित रहावे लागते.
त्यातच अनेक उद्याने धार्मिक कार्यासाठी व्यापली जात असल्याने मुलांनी खेळायचे कुठे, हा प्रश्न नेहमीच उभा ठाकतो. जी मैदाने व उद्याने आहेत, त्यातील खेळ खेळण्यावर राजकीय व प्रशासकीय खो घातला जातो. क्रीडापटूंच्या रसिकतेवरच विरजण घालण्याचे काम केले जाते.