कुठे नियमांचे पालन, तर कुठे सर्रास दुर्लक्ष; ठाण्यातील मॉल, लॉजची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:51 PM2020-09-06T23:51:05+5:302020-09-06T23:51:16+5:30
सहा महिन्यांनंतर ग्राहकांची पावले वळली
ठाणे : अनलॉक-४ मध्ये सरकारने मॉल, लॉज सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, सध्या ठाण्यातील केवळ विवियाना मॉल सुरू झाला आहे. जवळपास सहा महिन्यांपासून बंद असलेला हा मॉल सुरु झाल्यानंतर ठाणेकरांनी येथे भेट देण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिकेने बुधवारपासून मॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर जवळपास सहा महिन्यांच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांच्या स्वागतासाठी विवियाना मॉल सज्ज झाला आहे. ठाण्यात सध्या एकच मॉल सुरू असल्याची माहिती पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. या मॉलमध्ये येण्यासाठी नऊ प्रवेशद्वारे असून सध्या त्यांनी तीनच प्रवेशद्वारे खुली केली आहेत. पार्किंगपासून संपूर्ण मॉलमध्ये सॅनिटायझरची फवारणी, सॅनिटायझरचा बोगदा तयार केल्याचे पाहायला मिळाले. पार्किंगही सुरक्षित अंतर ठेवून करण्याचे आवाहन केले जाते. मॉलचे कर्मचारी हे मास्क घालून सुरक्षित अंतर ठेवून काम करत आहेत.
प्रवेशद्वाराजवळच आरोग्यसेतू अॅप इन्स्टॉल करून त्यात हिरवा संकेत दिल्यावरच आत प्रवेश दिला जात असल्याचे मॉल व्यवस्थापकांनी सांगितले. त्यानंतर, आत येणाऱ्या ग्राहकांची आॅक्सिजन पातळी आणि त्यांचे तापमान तपासल्यानंतर त्यांच्या बॅगेची तपासणी करताना ती सॅनिटाइज करूनच बाहेर येते. तसेच, ग्राहकांची तपासणीही हात न लावता सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच केली जात आहे. अनेक ठिकाणी कॉन्टॅक्टलेस सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे.
मॉलच्या आत आल्यावर समोरच माहिती विभागात मॉलचा नकाशा उपलब्ध असतो. तेथे आता हात न लावता स्कॅन करून मॉलचा नकाशा मोबाइलवर मिळवून दुकान शोधण्याची व्यवस्था केली आहे. आत आल्यावर गुलाबी रंगात फ्लोअर मार्कर जमिनीवर दाखविण्यात आले आहे. एका बाजूने जाण्याची आणि दुसºया बाजूने येण्याची दिशा दाखविणारे हे बाण आहेत. दुसºया बाजूला जाण्यासाठी हिरव्या रंगात येथून रस्ता ओलांडा, तर पिवळ्या रंगावर येथून ओलांडू नका, असे लिहिले आहे. सरकत्या जिन्यांवर जाण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसाठी जागा ठेवली आहे. त्यामुळे सरळ न जाता थोडा वळसा घालून वर जावे लागते आणि सरकते जिने सातत्याने सॅनिटाइज केले जातात.
सरकत्या जिन्यांवर पिवळ्या रंगात बाण दाखविले आहेत. तीन पायºया सोडून हे बाण दाखविले असून या बाणावर पाय ठेवून जायचे असल्याचे दर्शविले आहे. सुरक्षा राखण्याविषयी खात्री बाळगण्यासाठी मॉलने अल्ट्रा व्हायोलेट किरणोत्सर्गाद्वारे ृनिर्जंतुकीकरण केले जात आहे. मॉलने एस्केलेटर बेल्ट्स स्वच्छ करण्यासाठी यूव्ही लाइट बसविले आहेत. गर्दीच्या वेळी मॉलमधील सुरक्षारक्षक त्या ठिकाणी पोहोचून गर्दी टाळण्याचे आवाहन करतात.
प्रसाधनगृहात एक बेसीन सोडून दुसरे बेसीन बंद करण्यात आले आहे. तेही कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकवेळी स्वच्छ केले जात आहे. प्रसाधनगृहाच्या बाहेर आणि आत येण्याजाण्यासाठी बाण दाखविले आहेत. दुकानातही गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. काही दुकानदारांनी आयसोलेशन रूम तयार केल्या आहेत. मॉल सुरू झाल्यामुळे विचारांची नकारात्मकता दूर झाल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. सध्या मॉलमध्ये फूड कोर्ट, हॉटेल्स, सिनेमागृह बंद आहेत. फूड कोर्टमध्ये फक्त पार्सल व्यवस्था सुरू आहे.