विहिरीतच पाणी नाही तर नळातून कुठून येईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 06:12 IST2019-05-01T01:41:56+5:302019-05-01T06:12:35+5:30
शहापूर तालुक्यात टंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, ज्या गावपाड्यांत नळ योजना असूनही विहिरींना पाणीच नसल्याने त्या बंद आहेत.

विहिरीतच पाणी नाही तर नळातून कुठून येईल?
जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्यात टंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, ज्या गावपाड्यांत नळ योजना असूनही विहिरींना पाणीच नसल्याने त्या बंद आहेत. अशीच काहीशी परिस्थिती नडगाव ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील मानाचा पाडा येथे आहे. या पाड्याची लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास असून पाड्यासाठी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत गावातील विहिरीवरून साडेसात लाखांची पाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, ज्या विहिरीवरून ही योजना करण्यात आली त्याच विहिरीचे पाणी आटल्याने पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली.
नागरिकांना पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने ठराव पाठवून या पाड्याला टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाड्याला पाणी पुरवठा करण्यासाठी इतर दुसरा कोणताही स्रोत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या विषयी गावचे सरपंच नरेश हरी रेरा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दरवर्षी या विहिरीत पाणी असते. मात्र, यंदा पाऊस लवकर गेल्याने विहिरीचे पाणी आटले आहे. गावातील लोकांची गरज लक्षात घेत पाणीपुरवठा विभागाकडून टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. तालुक्यांतील अनेक तलाव आटल्याने तर काही तलावांची पाणी पातळी खालावल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.