लसीसाठी पैसे कोठून येणार,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:47+5:302021-05-21T04:42:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापालिका खरेदी करणार असलेल्या पाच लाख लसींसाठी पैसे कोठून येणार, अशी विचारणा केल्यावर गुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका खरेदी करणार असलेल्या पाच लाख लसींसाठी पैसे कोठून येणार, अशी विचारणा केल्यावर गुन्हा केला का, असा सवाल भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. एका मंत्र्याची पत्नी महापालिकेबाहेर पायऱ्यांवर आंदोलन करते, तर सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते झाडांच्या फांद्या घेऊन महापालिकेत येतात, हे राजकारण नसावे, तर ते शिवसेनेच्या दृष्टीने समाजकारण असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे लस खरेदीसाठी आवश्यक आर्थिक भार उचलणे शक्य नसल्याची कबुली महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांतच महापालिकेकडून पाच लाख लसखरेदीची तयारी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने लस खरेदीसाठी पैसे कोठून येणार, असा प्रश्न विचारला होता. मात्र, महापौर नरेश म्हस्के यांनी भाजप राजकारण करीत असल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेला अडचणीचे वाटणारे प्रश्न विचारल्यावर भाजप राजकारण करतेय, अशी बोंब मारण्यात महापौर म्हस्के आघाडीवर असतात, असेही त्यांनी नमूद केले. कोविड आपत्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक खर्चाचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. विचारपूस करणाऱ्या एका फोनसाठी १५ रुपये शुल्क देणे हा त्यातील प्रकार होता. त्याबाबत शिवसेना व महापौर मूग गिळून का गप्प आहेत, असा सवालही त्यांनी यांनी केला.
कूपन पळवापळवी सुरूच
लसीकरणातील व्हीआयपी कल्चर व कूपन सिस्टीम बंद करण्याची केवळ घोषणाच झाली. शिवसेनेचाच एक पदाधिकारी बिनधास्तपणे कूपन घेत होता. त्यावर शिवसेनेचे बडे नेते गप्प आहेत. त्यामुळेच सामान्य ठाणेकरांना रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे, असा आरोप त्यांनी केला.
-----------------------
धान्य पळविणाऱ्यांच्या चौकशीचे काय झालं?
कोरोना आपत्तीच्या काळात राज्य सरकारने कम्युनिटी किचनसाठी महापालिकेला पुरविलेला किराणा व धान्य काही बड्या पुढाऱ्यांनी परस्पर स्वत:च्या ब्रॅण्डिंगसाठी वापरला होता. या प्रकरणाच्या चौकशीची म्हस्के यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. या चौकशीचे काय झाले, ते प्रशासनाला विचारून माहिती जाहीर करावी. मात्र, एवढी हिंमत म्हस्के यांच्यात नाही, हे निश्चित, असा टोलाही डुंबरे यांनी लगावला.
..............