घोटाळा कुठे झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:33 AM2019-02-28T00:33:12+5:302019-02-28T00:33:17+5:30

प्रशासनाचा दावा : बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी

Where's the scam? | घोटाळा कुठे झाला?

घोटाळा कुठे झाला?

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या तब्बल तीन कोटींच्या कचराडबे प्रकरणात महापौरांनीच घोटाळा झाल्याची तक्रार केल्यावर पालिकेने महापौरांचा आरोप खोडून काढत घोटाळा झाला नसल्याचे पत्र दिले आहे. प्रतिडबा २१०० रुपयांप्रमाणे पालिकेने तब्बल १४ हजार २८४ डबे खरेदी केले असले, तरी अशा प्रकारच्या डब्यांचा बाजारभाव हा १५०० ते १७०० रुपयांच्या घरात आहे.


मे २०१७ मध्ये महासभेत नगरसेवकांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्यास प्रोत्साहन द्यावे, म्हणून डबेखरेदीचा ठराव केला होता. यासाठी पालिकेने आॅनलाइन निविदा मागवल्या होत्या. जुलै २०१८ मध्ये नीलकमल यांना प्रतिडबा २१०० रुपयांप्रमाणे तब्बल १४ हजार २८४ डबेखरेदीचा कार्यादेश दिला. या खरेदीसाठी तब्बल तीन कोटींचा खर्च आला आहे. गेल्या सप्टेंबर-आॅक्टोबरदरम्यान कंत्राटदाराने महापालिकेस निळ्या व हिरव्या रंगाचे डबे पुरवले. महापौरांसह नगरसेवकांनी नागरिकांना मोफत डबे पुरवण्याचा दावा करत इमारतींना प्रत्येकी दोन डबे वाटण्यात आले. परंतु, डबेवाटपानंतर घनकचरा शुल्काची देयके नागरिकांच्या हाती पडल्याने ते संतापले.


दरम्यान, महापौर डिम्पल मेहता यांनी डबेवाटप तसेच पाच हजार चाके व रॉड कमी असल्याचे तसेच काही नगरसेवकांनी डब्यांवर नावे टाकल्याची तक्रार केली. महापौरांनीच डबेप्रकरणी घोटाळा झाल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली.


आता उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी महापौरांना पत्र देऊन डबे प्रकरणात घोटाळा झाला नसल्याचा दावा केला आहे. डब्याची चाके व रॉड, क्लिपा, झाकणे आदी अपुऱ्या प्रमाणात पुरवल्याने वाटप करण्यात अडथळा निर्माण झाला होता. जानेवारीमध्ये कंत्राटदारास कळवल्यानंतर कंत्राटदाराने सुटे भाग पुरवले. प्रत्येक इमारतीस दोन डबे दिले असून त्याची वहीत नोंद केली आहे. प्रभाग ११ मधील नगरसेवकांनी डब्यावर स्वत:ची नावे टाकली असता ते कळताच त्यांची नावे काढली आहेत, असे डॉ. पानपट्टे यांनी पत्रात म्हटले आहे.


डबे खरेदी प्रकरणात लाखोंचा घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्याकर्त्यांसह काही लोकप्रतिनिधींनी चालवल्याने पालिकेकडून सारवासारव केली जात आहे. पालिकेने एक डबा २१०० रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले असले, तरी बाजारभाव व आॅनलाइन विक्री संकेतस्थळांवर अशाच प्रकारचे डबे हे १४०० रुपयांपासून १८०० रुपयांना उपलब्ध आहेत. पालिकेने खरेदी केलेल्या तब्बल १४ हजार नग इतके डबे खरेदीचा प्रस्ताव दिल्यास हेच दर आणखी कमी होणार आहेत.

दोषींच्या चौकशीची केली मागणी
हे डबेही कंत्राटदार कंपनीचेच असल्याने महापालिकेच्या संगनमताने अवास्तव दर आकारून या तीन कोटी रुपयांच्या डबे खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता जिद्दी मराठा, सत्यकाम फाउंडेशन यांनी केला आहे. डबे खरेदी, डब्यांचा दर्जा तसेच वितरणमध्ये घोटाळा झाल्याने कंत्राटदाराचे देयक देऊ नका, तसेच कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा व खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Where's the scam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.