रिक्षा सुरू ठेवायच्या की नाही? रिक्षाचालकांचा संतप्त सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:09+5:302021-04-23T04:43:09+5:30
डोंबिवली : राज्य शासनाने कडक निर्बंध लादल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून पोलिसांनी रिक्षाचालकांना स्टॅण्ड मोकळे करायला सांगितले. एकीकडे ...
डोंबिवली : राज्य शासनाने कडक निर्बंध लादल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून पोलिसांनी रिक्षाचालकांना स्टॅण्ड मोकळे करायला सांगितले. एकीकडे रिक्षा अत्यावश्यक सेवांमध्ये असल्याचे सांगतात अन् दुसरीकडे कारवाई होते. त्यामुळे नेमक्या रिक्षा सुरू ठेवायच्या की नाही, हे महापालिका, पोलिसांनी स्पष्ट करून हा तिढा सोडवावा, अशी मागणी भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी केली.
युनियन कुठली का असेना रिक्षाचालक हा रोजीरोटीसाठी व्यवसाय करत असतो. त्यात लॉकडाऊनमध्ये त्यांच्या व्यवसायाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे समस्यांत वाढ झाली असून आता राज्य शासन म्हणते अत्यावश्यकमध्ये रिक्षा आहे; परंतु तरीही रिक्षा स्टॅण्ड मोकळे करायला सांगतात. आठवडाभरात हे दोनदा झाले, त्यामुळे नेमके आम्ही करायचे तरी काय? वाहतूक पोलीस म्हणतात आम्ही कारवाई केली नाही, पोलीस म्हणतात सांगितले गेले असेल; पण दिवसाचा खाडा झाला त्याचे काय? असा सवाल त्यांनी केला. बंद असतील तर तसे कळवावे; पण एकदा रस्त्यावर व्यवसायाच्या अपेक्षेने आलेली वाहने पुन्हा घरी पाठवणे म्हणजे अपेक्षेवर पाणी फिरवण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.
-----------
राज्य शासन दीड हजार रुपये रिक्षाचालकांना देणार आहे. ते किती योग्य आहे हा भाग निराळा; पण एवढी तर इथल्या रिक्षाचालकांची दोन दिवसांची व्यावसायिक उलाढाल आहे. लॉकडाऊनचे कडक निर्बंध ३० एप्रिलपर्यंत आहेत. त्यामुळे कसे काय नियोजन करायचे, असा सवाल त्यांनी केला.
–-----------