युती टिकवायची की नाही, ते शिवसेनेच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:32 AM2018-05-31T00:32:13+5:302018-05-31T00:32:13+5:30
शिवसेना-भाजपाची युती व्हावी, असे भाजपाचे मत असून तसा प्रस्तावही त्यांना दिला आहे. आमची युतीही जुनी आहे, यापुढे ती टिकवायची किंवा नाही
ठाणे : शिवसेना-भाजपाची युती व्हावी, असे भाजपाचे मत असून तसा प्रस्तावही त्यांना दिला आहे. आमची युतीही जुनी आहे, यापुढे ती टिकवायची किंवा नाही, याचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याची माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विकासाची माहिती देताना बुधवारी ते बोलत होते.
पेट्रोल, डिझेलचे वाढणारे भाव ही चिंतेची बाब आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी कर कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, हे दर वाढले म्हणून महागाई वाढली, असा निष्कर्ष सरसकट काढता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. राज्य सरकारांनी कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या काळात महागाईचा दर हा ९.८ टक्के एवढा होता. तोच दर आता ४.२८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे त्या सरकारच्या कारभाराशी तुलना करता सध्या महागाई आटोक्यात असल्याचा दावा सहस्रबुद्धे यांनी यावेळी केला.
मागील चार वर्षांत भाजपा सरकारने केवळ हायवे, रस्ते विकास यावरच भर दिलेला नाही, तर तळागाळातील नागरिकांचा विकास करण्यावर अधिक भर दिल्याची माहिती त्यांनी दिली.
आधारकार्डची जरी सक्ती वाटत असली, तरीदेखील त्या माहितीचा फायदाच झाला असून त्यामुळे ५० हजार कोटी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात करदात्यांची संख्या तीन कोटी ८६ लाख एवढी होती. आता हाच आकडा दुप्पट होऊन सहा कोटी ८३ लाखांच्या घरात गेल्याकडेही सहस्रबुद्धे यांनी लक्ष वेधले.
बुलेट ट्रेनबाबत काही राजकीय मंडळींकडून दिशाभूल केली जात आहे. परंतु, शेतकऱ्यांची मने वळवली जातील आणि त्यांच्या मतानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल. सुरुवातीला कोणत्याही नव्या प्रकल्पाला विरोध हा होतच असतो. परंतु, नंतर तो मावळतो. त्यामुळे बुलेट ट्रेनचा विरोधदेखील मावळेल, अशी आशा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.