दिलेली आश्वासने पूर्ण झाली की नाही, भाजप आमदारानेच काढले पत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 06:04 AM2018-11-11T06:04:12+5:302018-11-11T06:04:50+5:30
कथोरे यांचे पत्रक : थेट संपर्क साधण्याचे आवाहन
बदलापूर : निवडणुका आल्या की,वारेमाप आश्वासने द्यायची आणि निवडणुका संपल्या की,मतदारसंघाकडे पाठ फिरवायची, अशीच परिस्थिती बहुतेक ठिकाणी दिसून येते. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी ‘आपला लोकप्रतिनिधी दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असेही फलक लावले जातात. मात्र, आमदार किसन कथोरे यांनी एक पत्रक काढून थेट नागरिकांनाच आवाहन केले आहे की, आपल्या मतदारसंघात जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण झालेली नसतील, तर त्यासंदर्भात थेट कार्यालयाशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांचे हे आवाहन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
निवडणूक लढवताना आश्वासनांची खैरात करायची आणि विजय निश्चित करण्याचा प्रयत्न करायचा, हा अलिखित नियम राजकारणात पाळला जातो. मात्र, निवडणुका झाल्यावर ती आश्वासने पाळली गेली की नाही, याची विचारणा कोणी करत नाही किंवा त्यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधीही काही चर्चा करत नाहीत.
राजकारणात आश्वासने पाळली जातात असे नाही. त्यामुळे नागरिकही या आश्वासनांची पूर्तत: व्हावी, अशी खास अपेक्षाही धरत नाही. राजकारणावरील विश्वास उडत असताना आमदार कथोरे यांनी मतदारसंघात एक वेगळेच अभियान सुरू केले आहे.
२०१४ च्या निवडणुकीत कथोरे यांनी जी आश्वासने दिली किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी आश्वासने दिली, त्या आश्वासनांची पूर्तता झाली आहे की नाही, याची चाचपणी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. जी आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, त्यासंदर्भात माझ्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन एका पत्रकाद्वारे केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत जीजी आश्वासने आपण दिली होती, तीती आश्वासने आपण पूर्ण केलेली आहेत. मात्र, तरीही मतदारांना काही वेगळी आश्वासने दिली असतील, तर त्यांनी त्यासंदर्भात लेखी अथवा स्वत: संपर्क साधून ते काम सुचवावे, असे आवाहन केले आहे. कथोरे यांनी पत्रके सर्व सोसायट्या, बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात वाटलेली आहेत. त्यामुळे त्यांचे हे आवाहनपत्रक चांगलेच चर्चेत राहिले आहे.
राजकारणात भलतेच धाडस दाखविले
केवळ नागरिकांनाच हे पत्रक देण्यात आले नसून शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनाही तशाच प्रकारचे आवाहन केले आहे. आमदार कथोरे यांनी असे पत्रक काढून केलेले राजकीय धाडस हे भलतेच चर्चेत राहिले आहे.