कोणते खेकडे छोटे, कोणते मोठे, हे चौकशीनंतरच समजेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:08 AM2019-07-08T06:08:52+5:302019-07-08T06:09:00+5:30
मेधा पाटकर : राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप
ठाणे : कोकणातील तिवरे धरण फुटून गावातील २३ जण मृत्युमुखी पडले. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. कोणते छोटे खेकडे आणि कोणते मोठे खेकडे, हे या चौकशीअंती कळेल. तिवरे धरण चिपळूणमध्ये असताना त्याचे ‘मॉनिटरिंग’ दापोलीमध्ये केले जात असून, महाराष्ट्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
श्रमिक जनता संघ आणि इतर असंघटित कामगारांच्या संघटनांचा मेळावा रविवारी ठाण्यात घेण्यात आला होता. या मेळाव्यात कामगार नेत्या मेधा पाटकर यांच्यासह जगदीश खैरालिया, संजीव साने व इतर कामगारवर्ग उपस्थित होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीत जनता १५ लाखाला विसरली असेल, पण हीच जनता कधीकधी सत्तेला आव्हान देते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. देशात चार नवीन कोड तयार होत आहेत. कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले जवळपास २३ कायदे बदलले त्यामुळे जातील. जे कायदेशीर निर्णय झालेले आहेत, ते कामगारांना मिळालेच पाहिजे. समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे. यासाठी श्रमिक जनता संघ प्रामाणिकपणे संघर्ष करत आहे. देशात खाजगीकरणाचे वारे वेगात वाहत आहेत. पण रोजगार वाढत नाही. कामगार व शेतकरी
दोन्ही संकटात आहेत. सार्वजनिक व्यवस्थेचे कंपनीकरण होत असून, त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. सर्व भांडवलदार संघटित आहेत. त्यांचा नफा रोज वाढतो आहे. पण कामगारांचे उत्पन्न वाढत नाही. उलट त्याची सुरक्षा कमी होत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.
‘कामगार मृत्यूप्रकरणी
खुनाचा गुन्हा दाखल करा’
काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भिंत पडून तब्बल १६ कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगारांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष देत नसून बड्या बिल्डरांच्या बाजूने सर्व उभे असतात. श्रमिकांची सुरक्षा कुठे गांभीर्याने घेतली जात नसल्याचे यावेळी पाटकर यांनी सांगितले. भ्रष्टाचारी बिल्डरवर गुन्हे दाखल केलेच पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करावेत, असे मत पाटकर यांनी व्यक्त केले.
ठाणे, कल्याण, मुंबई परिसरातील कंत्राटी, असुरक्षित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार, श्रमिकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी, श्रमिक जनता संघाच्यावतीने युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत ठाण्यातील टाउन हॉल येथे कामगार आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. घंटागाडी कामगार, रस्तेसफाईसाठी महापालिकेने ठेवलेले कंत्राटी कामगार, पाणी खात्यातील कंत्राटी कामगार आदी विविध क्षेत्रांतील कामगार आणि कार्यकर्ते या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने हजर होते.