पक्ष कोणता ते ठरेना...
By admin | Published: September 23, 2016 03:15 AM2016-09-23T03:15:12+5:302016-09-23T03:15:12+5:30
येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वपक्षीयांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
ठाणे : येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वपक्षीयांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. परंतु, चार प्रभागांचा एक वॉर्ड असल्याने प्रभाग कुठून कसा बदलणार, कशी रचना असेल, याबाबत अद्यापही संभ्रम असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधूनही आउटगोइंगबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. एकूणच प्रभागरचनेनंतर इनकमिंग आणि आउटगोइंगचे वारे जोरदार वाहतील, अशी शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारी, मार्चदरम्यान ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानुसार, सध्या काही अंशी इनकमिंग आणि आउटगोइंग सुरूदेखील झाले आहे. यापूर्वी पितृपक्षात इनकमिंग अथवा आउटगोइंग होत नव्हते. यंदा प्रथमच पितृपक्षातही शिवसेनेत काही नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही शिवसेना आणि भाजपामध्येच कडी टक्कर होईल, असे सध्या तरी भाकीत केले जात आहे. त्यामुळे या दोन पक्षांपैकी कोणतातरी एक पक्ष सत्तेत येणार असल्याने या पक्षामध्येच इनकमिंग अधिक होणार असल्याचे दिसत आहे.