उमेदवारी देताना पाटील, पवारांनी पैसे घेतले
By admin | Published: October 15, 2015 01:42 AM2015-10-15T01:42:13+5:302015-10-15T01:42:13+5:30
केडीएमसीच्या निवडणुकीत तिकीटवाटप करताना खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे
कल्याण : केडीएमसीच्या निवडणुकीत तिकीटवाटप करताना खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार यांनी आर्थिक
गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना उमेदवारी दिल्याने
संतप्त झालेल्या नाराजांनी येथील केडीएमसी मुख्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.
बंडखोरीच्या भीतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी भाजपानेही उमेदवारांची यादी जाहीर केली. यात उमेदवारी न मिळालेल्या काही इच्छुकांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. यास त्यांनी
स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरून शिवसेनेशी हातमिळवणी करून पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर केला आहे.
स्थानिक नेतृत्वाने आमच्याकडून सदस्य नोंदणी याचबरोबर अनेक कार्यक्रम राबवून घेतले. मात्र, उमेदवारी जाहीर करताना बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिले. बाहेरच्यांना तिकिटे दिली जाणार होती, तर सर्व्हेचा देखावा का केला, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जरी प्रामाणिक असले तरी त्यांच्या नावाखाली खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार यांनी तिकीटवाटप करताना घोडेबाजार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षात ६२५ जण इच्छुक होते. त्यामुळे सर्वांचेच समाधान होऊ शकत नाही.तिकीटवाटप मी आणि पाटील यांनी केलेले नाही. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी सर्व्हेच्या आधारावर उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात तथ्य नाही.