पुरुषांना गुरासारखी मारहाण तर, महिलांचे दिवसाढवळ्या शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:38 AM2021-08-29T04:38:51+5:302021-08-29T04:38:51+5:30

मजूर कामाला गेलो नाही म्हणून राजाराम पाटील याने मला पाच ते सातवेळा मारहाण केली. या मारहाणीत माझे दोन्ही हात ...

While men are beaten like cattle, women are exploited in broad daylight | पुरुषांना गुरासारखी मारहाण तर, महिलांचे दिवसाढवळ्या शोषण

पुरुषांना गुरासारखी मारहाण तर, महिलांचे दिवसाढवळ्या शोषण

googlenewsNext

मजूर

कामाला गेलो नाही म्हणून राजाराम पाटील याने मला पाच ते सातवेळा मारहाण केली. या मारहाणीत माझे दोन्ही हात दोनवेळा मोडले. त्यामुळे आता मला अवजड काम करता येत नाही. पोलिसांकडे गेलो तर पोलिसांनी कारवाई केली नाही. आता गवत विकतो त्यातून २०० ते २५० रुपये मिळतात.

- जगदीश चैत्या वाघे, मजूर

..........

नवरा आणि मला आठवड्याला फक्त ५०० रुपये देऊन घरकाम, गवत काढणे, गुरांना चारा घालणे, गुरे धुणे अशी कामे सांगत होते. कधी कधी सावकारांना माॅलिश व अंघोळ करताना शरीराला साबण लावण्याचे काम करायला लागत असे. एका दिवशी त्याने घरात बोलावून माझ्यावर बलात्कार केला.

पीडित महिला

----------------

माझी आई चार वर्षांपूर्वी वारली त्यावेळी राजाराम पाटील याने जबरदस्तीने माझ्या बाबांकडे पाच हजार रुपये दिले. त्यानंतर तीन वर्षे मी त्याच्या घरातील भांडीधुणे, पाणी भरणे व इतर कामे करीत होते. एक वर्ष मी वीटभट्टीवर देखील कामे केली. मात्र त्याचा कोणताही मोबदला मला व माझ्या वडिलांना दिला नाही. काही दिवसांपूर्वी त्याने मला अंगाला तेल लावून माॅलिश करायला सांगितले. मला त्याचे कपडे काढण्यास सांगितले. त्यास मी विरोध केला. राजाराम पाटील माझे कपडे काढत असतांना त्याची पत्नी आली. त्याने पत्नीला देखील शिवीगाळ, मारहाण केली. मलाही शिवीगाळ व मारहाण केली.

पीडित तरुणी

........................

मी गेल्या वीस वर्षांपासून राजाराम पाटील याच्या घरी मजुरी करतो. सुरुवातीला मला व माझ्या पत्नीला दोघांना एका आठवड्याला फक्त १०० ते १५० रुपये देत असे. सकाळी नाश्त्याला शिळे अन्न व दुपारी जेवण मिळत असे. त्यानंतर आठवड्यात दोघांना पाचशे रुपये मजुरी देत असे. दुसरीकडे कामाला गेलो तर, आम्हाला मारहाण होत होती. माझी पत्नी तीन महिन्यांची गर्भवती असतांना राजाराम याने मला व तिला मारहाण केली. माझ्या पत्नीच्या कमरेत लाथ मारली. तिची तब्येत बिघडली. मुलीला जन्म दिल्यावर तिचा मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

पीडित तरुणीचे वडील

------------------

माझ्या लग्नाला अंदाजे सहा- सात वर्षे झाली. त्याआधीपासूनच मी चंद्रकांत पाटील व राजाराम पाटील यांच्याकडे वीटभट्टीवर कामाला होतो. लग्नानंतर मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेजण त्यांच्या घरी कामाला जायचो. त्यांच्या मनासारखे काम झाले नाही तर, लाकडी दांडक्याने आम्हाला मारहाण करीत असे.

पीडितेचा पती

---–----------------------

राजाराम पाटील हा खूप वाईट माणूस आहे. पाड्यात एखादी महिला विवाह करून आली तर तो मजुरीसाठी घरी बोलवायचा. अनेक महिलांवर त्याने अतिप्रसंग केला आहे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.

- अरुणा अरुण वाघे, मजूर

----------------------------

जनी वाघे - मजूर महिला

माझ्या लग्नाला ३५ वर्ष झाली. या काळात सावकाराचा त्रास सहन केला. मारहाण सहन केली. मायबाप सरकारने त्यांना कठोर शिक्षा करावी एवढीच हात जोडून विनंती.

- जनी वाघे, मजूर

----------------------

मी मागील चार वर्षांपासून राजाराम व चंद्रकांत यांच्या खदाणीत, शेतावर वीटभट्टीवर काम करते. चार वर्षांपूर्वी खदानीतील दगड डोळ्याला लागल्याने माझ्या पतीचा डोळा कायमचा निकामी झाला. मागील चार वर्षात या सावकारांनी आम्हाला फक्त तीन हजार रुपये दिले. डोळ्यावर उपचार करण्यासाठी पैसे मागायला गेलो तर आम्हाला मारहाण करून हकलून दिले. पैशांअभावी माझ्या पतीचा डोळा कायमचा निकामी झाला.

- सविता संजय वाघे, मजूर

----------------------

शासनाने आमची वेठबिगारीतून सुटका केली. मात्र आता आमच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रेशनवर मिळणाऱ्या धान्याने पोट भरतो. मात्र इतर खर्च आ वासून उभे आहेत. सरकारने आमच्या रोजीरोटीची व कामाची व्यवस्था करावी.

- रघुनाथ पवार, मजूर

..............

वाचली

Web Title: While men are beaten like cattle, women are exploited in broad daylight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.