कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:45 AM2021-08-14T04:45:23+5:302021-08-14T04:45:23+5:30

................ सिंग व्हर्सेस सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांनी काही संवेदनशील प्रकरणात वरचेवर होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे ...

Whisper | कुजबुज

कुजबुज

Next

................

सिंग व्हर्सेस सिंग

ठाण्याचे पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांनी काही संवेदनशील प्रकरणात वरचेवर होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्याला ठाणे पोलीस आयुक्त पदावरून दूर करण्याची विनंती केली, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. अर्थात जय जीत सिंग यांनी हे संदेश खोटारडे व कुहेतूने पसरवले असल्याचा दावा करीत फेटाळून लावले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केल्यापासून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. परमबीर यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत खंडणीपासून वेगवेगळ्या गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. ठाण्यात पोलीस आयुक्त असताना परमबीर यांनी काही प्रकरणात बिल्डर, अधिकारी वगैरे यांच्याकडून कोट्यवधी रुपये वसूल केल्याबद्दल ठाणे नगर, कोपरी वगैरे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सिंग (जय जीत) हे सिंग (परमबीर) यांना जेरबंद करणार, असे दिसत आहे. (दीवार चित्रपटात भावाने भावाला सोडले नाही तर एक सिंग दुसऱ्या सिंगला पंजा मारणार नाही हे कसे होईल) त्यामुळे कारवाईच्या छायेत असलेल्या सिंग यांच्या सहानुभूतीदारांनी कारवाईचा आसूड हाती घेतलेल्या सिंग यांचे मनोधैर्य खच्ची करण्याकरिता सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल केली, अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे.

................

जो न देखे आयआयटीयन्स

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे पदवीधर आहेत. बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतल्यावर त्यांनी प्रॉजेक्ट मॅनेजमेंट मेथड्‌स अँड टेक्निक याबाबतचा जर्मनीतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलाय. आता पूल उभारणीचा फडणवीसांचा अभ्यास किती आहे हे काही कळायला मार्ग नाही. परंतु पूल उभारणीचा नितीन गडकरी यांचा जेवढा अभ्यास आहे तेवढा तो फडणवीस यांचा नाही. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसं सर्टिफिकेट दिलंय) अन्यथा शिवसेना-भाजप युतीचा पूल फडणवीसांच्या काळात तुटला नसता. ठाण्यातील कोपरी येथे एमएमआरडीएने बांधलेला पूल उत्तम बांधल्याचा दावा गुरुवारी फडणवीस यांनी केला. भाजप-मनसे यांच्यात पूल उभारण्याकरिता चंद्रकांतदादा पाटील राज ठाकरे यांच्याकडे चहा-कांदेपोहे खात असताना त्याच मनसेच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी ज्या कोपरी पुलाबाबत नाकं मुरडली त्याच पुलाला फडणवीस यांनी प्रशस्तीपत्रक दिले. (चंद्रकांतदादांचे पोहे जिरण्यापूर्वी आता पुन्हा त्यांना कृष्णकुंजवर नाश्त्याकरिता जावे लागणार) मनसेच्या टीकेनंतर आयआयटीच्या तज्ज्ञांनी कोपरी पूल पाहून बांधकाम सदोष असल्याचा निर्वाळा दिला होता. कोपरी पुलाचे काम फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सुरू झाल्याने ‘जनक’ (हा संजय केळकर यांचाच शब्द) या नात्याने कोपरी पूल त्यांना आपला वाटणे स्वाभाविक आहे. परंतु हा पूल पूर्ण केला महाविकास आघाडी सरकारने व त्याचे सर्व श्रेय नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. फडणवीस यांनी कोपरीचे कौतुक करून एकप्रकारे शिंदे यांच्यावर टीका करणे टाळल्याची चर्चा सुरू आहे. (राज्यात फोडाफोडी करून सरकार स्थापन करण्याचा विचार अजून फडणवीस यांनी सोडलेला नाही) पॉलिटिकल बिझनेस मॅनेजमेंटच्या हेतूने फडणवीस यांनी आयआयटीला खोटे पाडले हेच खरे.

..............

उडदामाजी काळे अन्‌ काळेच

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन का‌ळे यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्या पत्नीनेच त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर आरोप करीत तक्रार दाखल केली आहे. (सर्वच घरात महिला मराठी वाहिन्यांवरील सोशिक स्त्रिया डबडबलेले डोळे भरून पाहत असल्या तरी ते सत्य नव्हे) कोरोना काळात का‌‌ळे यांनी भरमसाट बिले देणाऱ्या इस्पितळांना इंगा दाखवला. राज्य वीज मंडळाचे कार्यालय भरमसाट बिलांकरिता फोडले तर रस्त्याला खड्डे पडताच पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाचे खळ्ळ खट्याक केले; पण इकडे कुटुंबातच खळ्ळ खट्याक झाले. आता राज ठाकरे उडदामाजी काळे-गोरे म्हणून काळेंना क्लीन चिट देणार की काळी उडदाची डाळ बाजूला करणार याकडे लक्ष लागले आहे.

...........

वाचली

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.