कुजबुज शनिवारचे सदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:10+5:302021-07-17T04:30:10+5:30
............. चक्रव्यूहात श्रोते पंकजा मुंडे यांची भगिनी प्रीतम यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. डॉ. भागवत कराड या गोपीनाथ ...
.............
चक्रव्यूहात श्रोते
पंकजा मुंडे यांची भगिनी प्रीतम यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. डॉ. भागवत कराड या गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्याचा समावेश झाल्याने महाराष्ट्र भाजपमध्ये महाभारत सुुरू झाले. महाभारत हे असे नाट्य आहे की, मानवी जीवनातील वेगवेगळ्या भावभावनांचे सर्व आविष्कार त्यामध्ये आहेत. त्यामुळे महाभारत टीव्हीवर सुरू होवो की, राजकारणात दर्शक, श्रोता थबकतो. पंकजा यांनी परळीतून वरळीत पाऊल ठेवताच महाभारतामधील अर्जुनाच्या अविर्भावात धर्मयुद्ध सुरू आहे. कौरव कारवाया करीत आहेत. छत कोसळत आहे. वगैरे तुफान टोलेबाजी सुरू केली. त्यामुळे पंकजा यांच्या स्वागताकरिता आलेले कार्यकर्ते तसेच रस्त्यावरून जाणारे हवशेगवशे थबकले. टाळ्या पिटत होते. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू आहे व आता तलवारीला तलवार भिडणार या कल्पनेने श्रोते रोमांचित झाले होते. सभा संपल्यावर पांगापांग झाली. कुणी वडापाववर तुटून पडला होता, तर कुणी गरमागरम चहाचे घोट घेत होता. त्यावेळी त्या बिचाऱ्यांना कल्पना नव्हती की, सध्या कोविडमुळे साथरोग कायदा लागू असून जमावबंदीचे आदेश जारी केलेले आहेत. अशावेळी `महाभारता`ची मजा घेण्याकरिता गर्दी केलेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
............
हसतील त्यांचे दात दिसतील
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. `अच्छे दिन आनेवाले है` या भूलथापा ठरल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने बैलगाडी मोर्चा आयोजित केला होता. काँग्रेसचे नेते बैलगाडीवर चढताच ती कोसळली. झाले लागलीच सोशल मीडियावर भाजपच्या ट्रोलर्सनी बैलांसारखी मेहनत करून एका ज्वलंत प्रश्नावरील आंदोलनाची बदनामी केली. काही वर्षांपूर्वी राष्ट्रपती पाय घसरून पडल्यावर काही वृत्तपत्रांनी त्याचे फोटो प्रसिद्ध केले होते. तेव्हा तो औचित्यभंग असल्याची टीका झाली होती. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना भाजपचे व्यासपीठ कोसळून गोपीनाथ मुंडे जखमी झाले होते. राज्यात भाजपचे सरकार असताना गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत खडसे समर्थक व विरोधकांनी भर कार्यक्रमात एकमेकांवर लक्ताप्रहार केले होते. असे घात-अपघाताचे प्रसंग प्रत्येक पक्षाच्या बाबतीत घडतात, पण केळीच्या सालीवरून पडलेल्या व्यक्तीला हात देणे ही प्रकृती तर पडलेल्याला पाहून दात काढणे ही विकृती आहे. पगारी ट्रोलर्सना हे कोण सांगणार?
..............
दरेकर ओशाळले
नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोकणात झालेल्या एका कार्यक्रमात आमदार नितेश राणे व खासदार विनायक राऊत एकत्र आले. साधारणपणे रस्त्यावर राडेबाजी झाल्यानंतर एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसणारे हे नेते एकमेकांना हारतुरे देताना बघून अनेकांनी आपल्या शेजाऱ्याला जोरदार चिमटा काढायला सांगितला. पक्षाने सांगितले तर कुणाशीही सहकार्य करू, असे नितेश बोलले तेव्हा राऊत गहिवरले होते. या दोघांच्या मधोमध डोंबिवलीतील भाजप आमदार रवींद्र चव्हाण बसले होते. त्या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नेमके डोंबिवलीत आले होते. पत्रकारांसमवेत त्यांनी ही बातमी टीव्हीवर पाहिली आणि पत्रकार परिषद सुरू करताच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे अनैसर्गिक संबंधाचे उत्तम उदाहरण असल्याचे ते बोलून गेले. एक-दोघा पत्रकारांनी पटकन जीभ चावली. आपली हुळहुळती जीभ तोंडात घोळवत `अनैसर्गिक संबंध` असे त्यांनी दरेकर यांना विचारले असता शब्दार्थ घेऊ नका भावार्थ घ्या असे ओशाळलेले दरेकर म्हणाले.
................
वाचली