कुजबुज शनिवारचे सदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:55+5:302021-07-31T04:39:55+5:30

सोशल मीडियाशी कट्टी सोसलं? महाराष्ट्रातील थोरले काका अर्थात शरद पवार यांनी राजकारणात पहाटे पहाटे उठण्याचा सल्ला एकेकाळी दिल्यामुळे अनेक ...

Whispered Saturday Sadar | कुजबुज शनिवारचे सदर

कुजबुज शनिवारचे सदर

Next

सोशल मीडियाशी कट्टी सोसलं?

महाराष्ट्रातील थोरले काका अर्थात शरद पवार यांनी राजकारणात पहाटे पहाटे उठण्याचा सल्ला एकेकाळी दिल्यामुळे अनेक मनसे नेते पहाटे उठतात व आपण उठलो आहोत, याची ग्वाही देण्याकरिता ट्विट करतात. आन्हिके उरकल्यावर नेते फेसबुक लाइव्ह करतात. आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्यावर अगोदर इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड होतात मग आंदोलनाची औपचारिकता पूर्ण होते. व्हॉट‌्सॲपला बातमी अगोदर गाजते मग दुसरे दिवशी वृत्तपत्रात यशावकाश प्रसिद्ध होते. अशा तक्रारी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत गेल्यामुळे ठाण्यातील बैठकीत यापुढे अगोदर स्थानिक पत्रकारांना बातमी द्या, त्यांच्याशी संपर्क ठेवा व सोशल मीडियाचा वापर कमी करा, असा मंत्र राज यांनी दिल्याची चर्चा आहे. अर्थात भाजपपासून शिवसेनेपर्यंत सारे पक्ष सध्या सोशल मीडियावर मिम्स, जोक्स, कार्टून्स, व्हिडिओ याद्वारे परस्परांवर ओरखडे काढत असताना आणि गल्लीतील आपले राजकारण दिल्लीपर्यंत गाजवत असताना सोशल मीडियापासून चार हात दूर राहण्याचा हा सल्ला मनसैनिकांच्या पचनी पडणे कठीण. सोशल मीडियावरून खळ्ळखट्याकची धमकी द्यायची आणि मग अचानक माघार घ्यायची अशा काही घटनाही राज यांच्या कानी गेल्याने सोशल मीडियाशी कट्टी घेण्याचा आदेश दिला गेलाय, अशी कुजबुज सुरू आहे. आता तो किती सोसवतो ते बघू...

...........

मोटारीचे बिंग फुटले

राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांच्या मोटारीला अलीकडे लोणावळ्याजवळ अपघात झाला. त्यामध्ये कुणाला फार लागले नाही. मात्र अपघाताची चर्चा सुरू झाली. कारण अपघातात नुकसान झालेली मोटार नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटची होती. सोनी यांच्याकडे बाजार समितीचा अतिरिक्त कार्यभार होता. परंतु आता तोही काढलेला आहे. तरीही बाजार समितीची मोटार ते उडवत होते. पणनमंत्री, राज्यमंत्री अथवा संचालक साऱ्यांनाच एपीएमसीच्या मोटारी आपल्या ताफ्यात हव्या, असे वाटते. आता मोटारीसोबत चालक व इंधनाचा खर्च एपीएमसीच्या बोडक्यावर आलाच. मागे एपीएमसीच्या मोटारी मंत्री-संत्री यांना देणे बंद केले होते. मात्र ते पुन्हा सुरू झाले. एपीएमसीच्या मोटारी पुन्हा दिल्या जातात हे आतापर्यंत फारसे कुणाला फारसे ठाऊक नव्हते. सोनी यांच्या मोटारीला अपघात झाल्याने बिंग फुटले.

...........

वाढदिवसाचा मुहूर्त हुकला

राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणीचा नारळ वाढवला होता. मात्र चार वर्षांत एकही वीट रचली गेली नाही. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बीडीडी चाळीच्या पुनर्बांधणीचा नारळ वाढवण्याकरिता बाजूला काढून ठेवला होता. मात्र अचानक रायगड जिल्ह्यात दरड कोसळली आणि जीवितहानी झाल्याने आव्हाड यांचा उत्साहदेखील चिखल-मातीखाली गाडला गेला. आता येत्या रविवारी १ ऑगस्ट रोजी बीडीडी चाळीचा नारळ पुन्हा वाढवला जात आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांना तेवढीच वरचेवर खोबरे हातावर पडण्याची चैन.

..............

हरियाणात विनोद

भारतीय जनता पार्टीचा मेळावा शुक्रवारी कल्याण पूर्वेत आयोजित केलेला होता. पत्रकार तेथे पोहोचले तर त्यांना एक परिचित चेहरा व्यासपीठावर दिसला. त्यामुळे पत्रकार अधिक जवळ गेले तर त्यांना धक्का बसला. ते चक्क विनोद तावडे होते. दीर्घकाळ टीव्ही वर्तमानपत्रे वगैरेतून गायब झालेल्या तावडे यांना पत्रकारांनी आज वाट चुकल्याने इकडे आलात का, असा सवाल करताच तावडे एकदम हरियाणवीत बोलू लागले. म्हणजे दंगल चित्रपटात तो डायलॉग आहे ना? ‘शुरुवात इन्ने करी थी पापा, मन्ने कुत्तीया कहा था और बबिता नी कमिनी. मैने भी दे दी दो-चार’. या स्टाइलमध्ये तावडे बोलू लागताच पत्रकारांना हा तावडेंचा हमशकल वाटला. त्यामुळे ते मागे वळताच तावडेंनी विलेपार्ल्यातील मराठी सुरू केले. मला मोदीजींनी केवळ दहा दिवसच महाराष्ट्रात राहायला सांगितले आहे. बाकी मी हरियाणात असतो, असे तावडे म्हणाले. देवेंद्रभाऊ जिला धाकटी बहीण संबोधतात ती पंकजाताई बिच्चारी दु:खीकष्टी आहे आणि देवेंद्रभाऊंचा मानलेला भाऊ सध्या हरियाणात समाधान मानतोय.

.................

लसीचा ल.सा.वि.

बदलापूर, अंबरनाथमध्ये खासगी केंद्रांवर सशुल्क लसीकरण सर्वप्रथम भाजपने सुरू केले. कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या लसीकरणास उत्तम प्रतिसाद मिळताच राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनी खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा सपाटा लावला. लसोत्सुक मंडळींनी रांगा लावून लस घेण्यास सुरुवात केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर, मीडियात लसीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या बऱ्याच बातम्या येत असल्याने भाजपच्या एका नेत्याने खासगी लसीकरण केंद्रांवर ०.५ मि.ली.ऐवजी ०.३ मि.ली. लस दिली जाते, असा आरोप करून ‘किसननीती’चा अवलंब केला. अर्थात शिवसेना-राष्ट्रवादीने या नीतीचा कडाडून विरोध केला. लसीकरणातील मात्रेचा हा ल.सा.वि. कदाचित निवडणुकीच्या राजकारणात भाजपकरिता म.सा.वि. ठरेल, असा त्या नेत्याचा होरा असावा.

...........

Web Title: Whispered Saturday Sadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.