कुजबुज शनिवारचे सदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:53+5:302021-09-25T04:43:53+5:30

मुंबई काँग्रेसचा सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग हा जबाबदारीच्या संगीत खुर्चीचा खेळ बनला आहे. अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांसोबतच सर्वांना संधी देण्याकरिता ...

Whispered Saturday Sadar | कुजबुज शनिवारचे सदर

कुजबुज शनिवारचे सदर

Next

मुंबई काँग्रेसचा सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग हा जबाबदारीच्या संगीत खुर्चीचा खेळ बनला आहे. अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांसोबतच सर्वांना संधी देण्याकरिता प्रचार समिती, जाहीरनामा आणि प्रकाशन समिती, प्रदेशाचे प्रभारी, छाननी आणि धोरण समिती, पदसिद्ध सदस्य, सदस्य अशा गोतवळ्यात समन्वय समिती बनवली गेली. प्रत्येकाला पद आणि खुर्ची मिळाली खरी, पण `जबाबदारी` ती बिच्चारी दुर्लक्षित राहिली. जबाबदारी शिरावर घेणार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचवेळी भाजप महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. बुथप्रमुखांना प्रदेश कार्यालयातून फोन करून ते जागेवर आहेत किंवा कसे, याची खातरजमा केली जात आहे. जुने संघ स्वयंसेवक, भाजपचे वयोवृद्ध कार्यकर्ते यांना घरी जाऊन नेते भेटत आहेत. काँग्रेसमधील नेते समित्यांच्या गाद्यागिर्द्यांवर लोळत पडले आहेत. जबाबदारीचा बोजा उचलायला कुणीतरी येईल, अशीच बहुतांश नेत्यांची मानसिकता आहे. अमरजित मनहास यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे समन्वयाची जबाबदारी दिली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या मनहास यांना हे पद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे होते. प्रदेश काँग्रेसच्या १९० जणांच्या जम्बो कार्यकारिणीत खजिनदारपदाची महत्त्वाची जबाबदारी मनहास यांच्यावर आल्याने मुंबई काँग्रेसच्या समित्यांच्या हेव्यादाव्याची धुणी धूत राहण्यापेक्षा प्रदेश काँग्रेसच्या तिजोरीच्या चाव्याचा गुच्छ बोटात फिरवत ते गेले. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने निवडणुकांच्या बैठकांची जबाबदारी अनिल परबांच्या शिरावर सोपवली आहे. पक्षकार्यात चोख असणाऱ्या परबांच्या मागे सोमय्यांनी फटाक्यांची माळ लावल्याने ते कातावले आहेत. अर्थात परबांनी शंभर कोटींचा दावा लावल्याने सेना लवकरच उभारी घेईल. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आता `जबाबदारी एक समृद्ध अडगळ` असा ग्रंथ निवडणुकीपूर्वी लिहून मोकळे होण्याचा निर्धार केला आहे.

.....................

मामांनी केले मास्कचे विसर्जन !

कडकोट पहारा. स्वयंसेवकांनी तयार केलेली साखळी. जीवरक्षक सोडले तरी कोणालाच तलाव परिसरात प्रवेश नव्हता. कोरोनाचे सगळे नियम पाळले जात होते. अशा बंदोबस्तातही जे गणेशभक्त सीमा ओलांडत होते, कोरोनाचे नियम मोडत होते, त्यांना पोलिसांचा ` प्रसाद` मिळत होता. त्यामुळे तोंडावर मास्क आणि सुरक्षित अंतर पाळा; हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून कुर्ल्यातल्या शीतल तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन सुरू होते. मात्र, महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत ‘मामा’ म्हणून सुपरिचित असलेले एक लोकप्रतिनिधी विनामास्क येथे दाखल झाले; आणि मामांना विनामास्क पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या, पण मामांचा दरारा एवढा की, सगळ्यांचीच हाताची घडी, तोंडावर बोट. विनामास्क येण्याचा चमत्कार करणाऱ्या मामांना सगळ्यांचे नमस्कार झाले. काहींनी तर प्रेमापोटी (किंवा कायदेभंगाकरिता) चरणस्पर्श देखील केले. थोड्यावेळ इकडे तिकडे केल्यानंतर मामांनी दोन्ही हात कंबरेवर ठेवले. ऐटीत मान ताठ केली. ओळख म्हणून ठेवलेल्या दाढीवरून त्यांनी हात फिरवला. तरीही मास्क लावला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले नसावे. त्याच तोऱ्यात मामांनी तराफ्यावरील कार्यकर्त्यांना हात दाखवला आणि स्वत: तराफ्यावर दाखल झाले. तराफ्यावर दाखल झाल्यावर गणेश विसर्जनाची पाहणी केली, पण मास्क काही तोंडावर लागेना. तलावाची पाहणी केल्यानंतर बाईट देताना मास्कची गरज नव्हतीच; किमान बाईट झाल्यानंतर मास्कची आठवण होईल, पण तेही नाहीच. तोवर आणखी कार्यकर्त्यांचा गोतावळा गोळा झाला. गर्दी वाढली. मामा आपल्या पुढच्या दौऱ्याला रवाना झाले. कोरोना असूनही मामांनी मास्क न लावल्याने लोकप्रतिनिधी मास्क लावत नसतील तर जनता कशी लावणार करणार? अशी कुजबुज सुरू होती.

..............

मंदाताईंचे सीमोल्लंघन

आमदार मंदाताई म्हात्रे हा दबंग शब्दाचा प्रतिशब्द. मध्यंतरी एका कार्यक्रमात त्यांनी भाजपमधील कार्यक्रमाला आपल्याला डावलले जाते, पोस्टरवर आपला फोटो लावला जात नाही याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. मंदाताईंच्या या नाराजीवर इतक्या कडकडा टाळ्या पडल्या की, राज्यातील भाजप नेत्यांच्या लाडोबांनाही टाळ्या पिटाव्या लागल्या. मंदाताईंच्या नाराजीची उच्च पातळीवर दखल घेतली जाण्यापूर्वीच त्यांनी दुसरा बॉम्बगोळा फेकला. गणेश नाईक यांच्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात विकासकामे करण्यात आमदार अपयशी ठरल्याने आता मला सीमोल्लंघन करून बेलापूरमधून ऐरोलीत यावे लागेल व कामे करावी लागतील, असे मंदाताई बोलल्या. यामुळे नाईकांच्या नाकाला मिरच्या झोंबणे स्वाभाविक आहे. मंदाताई हे स्वत:हून बोलत आहेत की, भाजपमधील काही नेते त्यांना हे बोलायला भाग पाडत आहे, याचाच विचार सध्या नाईक करतायत.

.............

वाचली

Web Title: Whispered Saturday Sadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.