असाच हा गिळायचा हुंदका...

By Admin | Published: August 14, 2016 03:52 AM2016-08-14T03:52:45+5:302016-08-14T03:52:45+5:30

पप्पा, तुम्ही घरी कधी येणार? तुम्हाला इथं जेवायला देतात? तुम्ही लवकर घरी आला नाहीत, तर मी तुमच्याशी बोलणार नाही...डोळ्यांतून घळाघळा अश्रू पाझरत आहेत आणि निरागस

This is a whistle swallowed ... | असाच हा गिळायचा हुंदका...

असाच हा गिळायचा हुंदका...

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे,  ठाणे

पप्पा, तुम्ही घरी कधी येणार? तुम्हाला इथं जेवायला देतात? तुम्ही लवकर घरी आला नाहीत, तर मी तुमच्याशी बोलणार नाही...डोळ्यांतून घळाघळा अश्रू पाझरत आहेत आणि निरागस प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे... पप्पानंही आपल्या सानुलीला उराशी घट्ट कवटाळून तोही अश्रू ढाळत आहे... अन् या स्निग्ध नात्यांचा घट्ट बंध ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या काळ्याकभिन्न भिंती निर्विकारपणे डोळ्यांत साठवत आहेत, अशी अनुभूती शनिवारी तेथे हजर असलेल्यांना आली. निमित्त होते ते शिक्षेतले बंदी आणि त्यांच्या नातेवाइकांच्या गळाभेट कार्यक्रमाचे.
आपल्या वडिलांना १६ महिन्यांनी भेटायला आलेल्या पाच-सहा वर्षांच्या चिमुकलीचे डोळे वडिलांना पाहताच पाणावले. तिचा पप्पाही तिला पाहताच दोन्ही हात पसरून उभा होता. वाऱ्याच्या वेगानं जाऊन तिनं आपल्या पित्याला घट्ट मिठी मारली. मुलीला भेटल्यानं वडिलांच्या चेहऱ्यावरही हास्य फुललं होतं. दुसऱ्या एक मुलीनं आपल्या वडिलांना पहिल्यांदाच बंदीच्या गणवेशात पाहिल्यानं तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. वडिलांकडे ती एकटक पाहत होती. काय बोलावं, कसं बोलावं, या विचारांचा घोळ तिच्या डोक्यात सतत चालू होता. वडील तिची विचारपूस करीत होते. तिचे डोळे मात्र अश्रूंनी डबडबले होते. आपल्या या लाडक्या चिमुकलीला मांडीवर घेऊन वडिलांनी घट्ट मिठी मारली आणि ते तिचे सारखे पापे घेत होते. मग, हळूहळू तिची कळी खुलली. ती शाळेतल्या गमतीजमती सांगू लागली. आज वडिलांना भेटायला जायचे, असं समजल्यापासून ती खूप आनंदी होती. सकाळपासून ‘पप्पांना भेटायला कधी जायचं’ असं ती सतत विचारत होती, असं तिच्यासोबत आलेल्या नातलगांनी सांगितलं.
वाडा येथून दोन चिमुरड्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आपल्या आईसोबत आल्या होत्या. तीन महिन्यांनी त्या वडिलांना भेटत होत्या. वडिलांना पाहिल्यावर या मुलींच्या आनंदाला पारावार उरला नाही. एक मुलगीआपल्या वडिलांना शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेलं भाषण म्हणून दाखवत होती, तर दुसरी शाळेत कायकाय शिकवतात, ते आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून सांगत होती. पप्पा तुम्ही घरी चला, असा निरागस तगादा या चिमुरडीने लावला होता आणि त्यांचे वडील आपल्याला लागलीच येथून येणं शक्य नाही, अशी समजूत काढत होते.
पप्पांना भेटून खूप आनंद झाला. आमचे वडील लवकर घरी यावे, अशी आम्ही रोज देवापुढं प्रार्थना करतो, असं त्या दोघी सांगत होत्या. पप्पा, आमच्याशिवाय तुम्हाला इथं कसं करमतं, असा सवाल एकीनं करताच पप्पांच्या डोळ्यांतही पाणी आलं.
भेटीची वेळ संपली... पोलिसाच्या मागोमाग त्यांचे पप्पा जायला उठले. त्या चिमुकल्यांनी ‘पप्पा...’ अशी आर्त हाक घातली. कारागृहाच्या त्या निर्जीव भिंतींना ती हाक ऐकू आली की नाही, कुणास ठाऊक, पण पाठमोऱ्या पप्पानं ती ऐकली आणि तो आपले अश्रू लपवत काळोख्या कोेठडीत गडप झाला... आई, पप्पा आपल्याबरोबर का नाही आले... ते घरी कधी येणार... या मुसमुसत्या स्वरातील प्रश्नांना त्या माऊलीकडंही उत्तर नव्हतं. तिचेही डोळेही विरहानं झरत होते...

पुणे येथील येरवडा तुरुंगातील पक्क्या कैद्यांच्या अलीकडेच झालेल्या गळाभेट कार्यक्रमानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही शनिवारी प्रथमच गळाभेटीचा कार्यक्रम पार पडला. यापूर्वी शिक्षेतील बंदींना नातेवाईक भेटण्यासाठी येत होते. परंतु, त्यावेळी भेटीला आलेली चिमुकली आपल्या पप्पाला काचेच्या किंवा जाळीच्या पलीकडून भेटत असे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू झाला.
वडिलांना आज भेटायला जायचं, असं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. घरी रोज यांची आठवण काढून दोघी ढसाढसा रडत असतात. त्यांचे खाण्यापिण्याकडेही लक्ष नसते. पप्पांना कधी भेटायला जायचं, हे विचारून मला भंडावून सोडतात, असं त्या चिमुकल्यांची आई सांगत असताना तिचा कंठ दाटून आला.

Web Title: This is a whistle swallowed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.