डोंबिवलीत पेंडसेनगरमध्ये आढळला पांढरा कावळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:56+5:302021-06-30T04:25:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरातील प्लांट ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर सोसायटीला (पॉज) मंगळवारी दुपारी पूर्वेतील पेंडसेनगर परिसरात पांढरा कावळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील प्लांट ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर सोसायटीला (पॉज) मंगळवारी दुपारी पूर्वेतील पेंडसेनगर परिसरात पांढरा कावळा आढळून आला. संस्थेला हेल्पलाईनवर या कावळ्याबाबत माहिती मिळताच पक्षीमित्रांनी तेथे जाऊन या कावळ्याला अन्य कावळ्यांच्या मारापासून वाचवून सुरक्षित ठिकाणी नेले.
याबाबत ‘पॉज’चे संचालक नीलेश भणगे म्हणाले की, पेंडसेनगरमधील महेश व्हिला इमारतीजवळ पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. तेथे दक्ष नागरिक हितेश शहा यांना तो कावळा दिसला. याबाबतची माहिती त्यांनी ‘पॉज’च्या हेल्पलाईनवर दिली. शहा म्हणाले की, ‘माझ्या घराजवळ येणाऱ्या पक्ष्यांमध्ये एक वेगळाच पक्षी मला दिसला. कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केले, तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण, चोच आणि डोळे हे कावळ्यासारखेच असल्याचे लक्षात आले. त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री पटली. नीलेशने लगेच जाऊन त्याला बाकी काळ्या कावळ्यांच्या मारातून वाचवले. त्या पक्ष्याला मुरबाड येथील त्यांच्या संस्थेच्या रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे.’
पांढरा कावळा क्वचितच आढळतो. खरंतर पांढरा कावळा ही कोणतीही नवीन प्रजाती नसून, अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे. पक्षी-प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंगद्रव्ये मेलानीन, कॅरेटीनोइड आणि पॉरफिरिनसया प्रकारची असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी, जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते, असे भणगे यांनी सांगितले.
मेलानीनचे द्रव्य कमी असल्याने पांढरा रंग
कावळ्याचा पांढरा रंग हा नैसर्गिक आहे. डोंबिवली येथील तो कावळा ल्युकेस्टिक आहे. काळा रंग येण्यासाठी शरीरात मेलानीनचे द्रव्य आवश्यक असते. ते कमी असल्यामुळे कावळ्याला पांढरा रंग येतो. एका अर्थाने हा पांढरा कावळा नाही, तर त्याच्यातील अनुवंशिकतेमुळे तो पांढरा राहिला आहे, असे पक्षीतज्ज्ञ प्रज्ञावंत माने यांनी ‘पॉज’ला सांगितले.
---------