ठाण्यातील रिक्षाचालकांना कोण दाखवणार चौदावे रत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:00 AM2018-04-30T03:00:33+5:302018-04-30T03:00:33+5:30

मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दराचा भडका उडाला आहे. त्याचे चटके सर्वसामान्यांना बसू लागले आहेत. ठाण्यात या दरवाढीचे निमित्त साधून रिक्षाचालकांनी पुन्हा आपल्या मनमानी कारभाराची चुणूक दाखवली आहे.

Who is the 14th gem to show the Rickshaw drivers in Thane? | ठाण्यातील रिक्षाचालकांना कोण दाखवणार चौदावे रत्न?

ठाण्यातील रिक्षाचालकांना कोण दाखवणार चौदावे रत्न?

Next

अजित मांडके, ठाणे
मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दराचा भडका उडाला आहे. त्याचे चटके सर्वसामान्यांना बसू लागले आहेत. ठाण्यात या दरवाढीचे निमित्त साधून रिक्षाचालकांनी पुन्हा आपल्या मनमानी कारभाराची चुणूक दाखवली आहे. आधीपासूनच या बेशिस्त रिक्षाचालकांमुळे ठाणेकर त्रस्त असताना आता शहराच्या विविध भागांत अनधिकृतपणे धावणाऱ्या शेअर रिक्षाचालकांनी कुणाचीही परवानगी न घेता परस्पर प्रवासी भाडे वाढवले आहे. याबाबत विचारल्यावर ‘तुमको आना है तो आओ, नही तो छोड दो’ अशी उद्धट उत्तरे हे रिक्षाचालक ग्राहकांना देत आहेत.
ठाणेकरांसाठी पर्यायी वाहतूक साधने म्हणून सध्या रिक्षा, खाजगी बसगाड्या आहेत. या पर्यायी वाहतूकदारांची मनमानी मागील कित्येक वर्षांपासून वाढली आहे. ठाण्यातील रिक्षाचालकांच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको. त्यांनी तर कहरच केला आहे. ठाणे शहरात आजघडीला सुमारे ३५ हजार अधिकृत रिक्षा आहेत. अनधिकृत रिक्षांची संख्या गृहीत धरता ही संख्या सुमारे ५० ते ५५ हजारांच्या घरात जाते. नव्याने परमिट देण्यास सुरुवात झाल्याने त्यात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष निर्माण झाला आहे. परंतु याचा मन:स्ताप सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. जवळचे भाडे नाकारणे हा तर जणू रिक्षावाल्यांचा जन्मसिद्ध हक्क झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांबरोबर भांडणे होतांना दिसत आहे. या रिक्षाचालकांच्या सुरू असलेल्या गुंडगिरीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. अनेक ठिकाणी या रिक्षाचालकांमुळे महत्त्वाच्या चौकात, रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. वाहतूक पोलीस अथवा आरटीओने कोणतेही नियम बनवले तरी आम्ही आमच्या नियमाप्रमाणेच कारभार करणार, असा जणू अट्टहासच त्यांच्याकडून सुरू आहे. ठाणे स्टेशनचा आपण विचार केला तर या ठिकाणी पादचाºयांना चालता यावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेने मागील काही महिन्यांपूर्वी महत्त्वाचे बदल केले. लेनबाहेर जाऊन रिक्षा लावणाºया रिक्षाचालकांसाठी आणखी लेन वाढवण्यात आल्या. तसेच खाजगी वाहनांना जाण्यासाठी एक लेन तयार करण्यात आली. परंतु, काही मोजकेच दिवस या नियमाचे पालन या बेशिस्त रिक्षाचालकांनी केले. त्यानंतर ‘ये रे माझ्या मागल्या’ यानुसार या रिक्षाचालकांनी ठाणे स्टेशन परिसरात पुन्हा उच्छाद मांडला. लेनच्या बाहेर जाऊन फलाट क्रमांक-१ पर्यंत रस्त्यात कशाही पद्धतीने शेअर रिक्षा उभ्या करणे, जादा भाडे आकारणे, असे प्रकार सुरू आहेत. या रिक्षाचालकांच्या विरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु, त्याचा काहीच फरक पडलेला नाही. त्याचे कारणही तसेच आहे. कारण, येथे कुंपणच शेत खात असल्याने त्या रिक्षावाल्यांना कोण शिस्त लावणार, अशी परिस्थिती आहे. या रिक्षाचालकांवर वचक बसावा म्हणून येथे वाहतूक पोलीस नियुक्त करणे अपेक्षित आहे. परंतु, अनेकदा वाहतूक पोलीस या ठिकाणी दिसत नाहीत आणि दिसले तरी या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे या रिक्षाचालकांचे चांगलेच फावले आहे.
केवळ स्टेशन परिसरातच नाही तर पुढे अलोक हॉटेल, बी केबिन, गावदेवी, गावदेवीचा पुढील भाग, जांभळीनाका, कॅसल मिल, माजिवडा, कापूरबावडी, आदी ठिकाणी बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. ठाण्यातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि रिक्षाचालकांना वठणीवर आणण्याकरिता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी हाती छडी घेतली होती. परंतु, त्यांनी छडी खाली ठेवताच, पुन्हा रिक्षाचालकांनी आपली दादागिरी सुरू केली आहे. बसथांब्यावरून प्रवासी उचलणे, रस्त्यात कुठेही कशाही पद्धतीने रिक्षा लावणे, प्रवाशांसोबत हुज्जत घालणे हे तर यांच्यासाठी काहीच नवीन नाही. त्यांच्या या अरेरावीमुळे अलोक हॉटेलच्या परिसरात तोबा वाहतूककोंडी झालेली दिसते. गावदेवीच्या वळणावर एका रांगेत रिक्षा उभे करणे अपेक्षित असताना तेथे दोनतीन रांगा लावून हे रिक्षाचालक वाहतुकीला ब्रेक लावतात. परंतु, त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. या रिक्षाचालकांना शिस्त लागावी म्हणून वाहतूक पोलीस आणि आरटीओने टोल फ्री क्रमांक सुरू केला. त्यावर काही प्रमाणात तक्रारी केल्या जात आहेत. परंतु, कारवाई फारशी होत नसल्याने केवळ नावापुरते हे क्रमांक आहेत का, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत. रिक्षाचालकांवरील कारवाई ही एकतर केवळ कागदावर आहे किंवा दिखाव्यापुरती आहे. अनेक शेअर रिक्षाचालकांचे थांब्याच्या ठिकाणी नियुक्त वाहतूक पोलिसांना हप्ते बांधलेले असल्याची माहिती हेच रिक्षाचालक देतात. एकूणच शासकीय यंत्रणा रिक्षाचालकांपुढे हतबल आहे, हेच स्पष्ट होते.
रिक्षाचालकांची दादागिरी कमी होण्याचे नाव घेत नसताना या गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांनी पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याचे कारण देत आपल्या पद्धतीने भाडेवाढ केली आहे. भाडेवाढ करण्याचे काही नियम असतात. भाडेवाढ करताना आरटीओची परवानगी घ्यावी लागते. युनियनच्या माध्यमातून भाडेवाढ करण्यामागचे कारण लोकांना पटवून द्यावे लागते. परंतु अशी कोणतीही प्रक्रिया न करता शेअर रिक्षाचालकांनी आपल्या सोयीनुसार भाडेवाढ करून ठाणेकर प्रवाशांची लूट सुरू केली आहे. परंतु सकाळी कार्यालय व सायंकाळी घर लवकर गाठायचे असल्याने प्रवासी नाइलाजास्तव रिक्षाचालकांच्या मनमानीपुढे मान तुकवून अतिरिक्त भाडे देत आहेत. स्टेशन परिसरातून घोडबंदरकडे जायचे झाल्यास पूर्वी पातलीपाडापर्यंत ३० रुपये आकारले जात होते. आता थेट ५० रुपयांचे भाडे आकारले जात आहे, तर मानपाड्यापर्यंत जायचे झाल्यास, २५ रुपयांचे भाडे आकारले जात होते. ५ ते १० रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. पातलीपाडा ते हिरानंदानी इस्टेट भागात जायचे झाल्यास पूर्वी १० रुपये आकारले जात होते. आता त्यात २ रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. अशाच प्रकारची भाडेवाढ लोकमान्यनगर, यशोधन, नितीन कंपनी आदी मार्गांवर धावणाºया शेअर रिक्षाचालकांनी करून घेतली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसून ज्या ठिकाणी १० रुपये आकारले जात होते, त्याठिकाणी १५ रुपये आकारले जाऊ लागले आहेत. एकूणच १५ रुपयांची ही भाडेआकारणी ठाणेकरांकरिता डोकेदुखी आहे. परंतु या भाडेवाढीबाबत साधा ब्र काढण्याची हिम्मत युनियनवालेदेखील करत नाहीत. आरटीओलादेखील या भाडेवाढीबद्दल माहिती नसल्याने रिक्षाचालकांच्या अनधिकृत भाडेवाढीने ठाणेकर प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे.

Web Title: Who is the 14th gem to show the Rickshaw drivers in Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.