टार्गेट नेमके कोण; आयुक्त की अधिकारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:51 AM2017-09-12T05:51:35+5:302017-09-12T05:51:40+5:30
शहरातील विकासकामे हवी तशी मार्गी लागत नसल्याने एकीकडे आयुक्त आणि अधिकारी नगरसेवकांच्या टार्गेटवर असतानाच ‘नगरसेवक नाटक करतात,’ या वक्तव्यावारून महासभेत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरासेवक त्यांना कोंडीत पकडणार असल्याने यावेळी महासभा गाजण्याची चिन्हे आहेत.
उल्हासनगर : शहरातील विकासकामे हवी तशी मार्गी लागत नसल्याने एकीकडे आयुक्त आणि अधिकारी नगरसेवकांच्या टार्गेटवर असतानाच ‘नगरसेवक नाटक करतात,’ या वक्तव्यावारून महासभेत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरासेवक त्यांना कोंडीत पकडणार असल्याने यावेळी महासभा गाजण्याची चिन्हे आहेत. पालिका अधिकारी युवराज भदाणे यांच्या अभिनंदनाचा ठराव महासभेत भाजपाने दाखल केला आहे, तर त्यांच्याच निलंबनाचा प्रस्ताव सेनेने दिल्याने तोही चर्चेचा विषय आहे.
शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नगरसेवक संतप्त आहेत. बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या बोटचेप्या धोरणामुळे विकासकामे ठप्प झाल्याचा सेनेचा आरोप आहे. त्यांच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे शिवसेनेने केली आहे. एकूणच आयुक्त सतत वादात सापडत असून महासभेत आयुक्त विरूद्ध नगरसेवक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
मनपा जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी मालमत्ता कर विभागात चांगले काम केल्याबाबत भाजपा नगरसेवक राजा वानखडे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणला, तर सेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी, रिपाइंचे गटनेते तसेच शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी भदाणेंच्या निलंबनाचा ठराव आणला. मालमत्ता करविभागाच्या प्रभारी कर निर्धारकपदी असताना त्यांनी एका मालमत्तेचे करनिर्धारण ७० लाख केले, तर उपायुक्त दादा पाटील यांनी त्याचेच करनिर्धारण १० लाख केल्यानेही वाद आहे. कर कमी झाल्याचे भदाणे यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी उपायुक्त दादा पाटील व नगरसेवक भगवान भालेराव यांना नोटिसा देऊन आठ दिवसात म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. पण कराच्या प्रस्तावावर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचीच सही असल्याचे उघड झाले.
महासभा गाजणार?
आयुक्तांनी अचानक युवराज भदाणे यांची करनिर्धारण पदावरून उचलबांगडी केली. या मालमत्ता कर आकारणी प्रकरणी पुढे काय कारवाई झाली, असा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात उपस्थित करणार असून हे प्रकरण शांत का झाले, हा सवालही उपस्थित होतो आहे.