शिवसेनेत नेमका गद्दार कोण?; केडीएमसीच्या स्थायी समितीत पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 01:05 AM2020-01-18T01:05:20+5:302020-01-18T01:05:36+5:30
राज्यातील महाविकास आघाडीमुळे महापालिकेत शिवसेना व भाजपने फारकत घेतली आहे. त्यात कोट यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे चार सदस्य व एक अपक्ष यांच्यासह पाच सदस्यांनी त्यांची जागा विरोधी सदस्य बसतात,
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे हे प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर राहिले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गणेश कोट यांचा पराभव झाला होता. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेतील गद्दार कोण, या प्रश्नाचे पडसाद उमटले.
कोट यांच्या पराभवानंतर शुक्रवारी प्रथमच स्थायी समिती सभा झाली. भाजपचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांची ही पहिलीच सभा होती. मात्र, गटनेत्यांची सातव्या आयोगाच्या मंजुरीसंदर्भात महापौर दालनात आयुक्तांसोबत बैठक सुरू असल्याने स्थायी समितीची सभा सुरू होण्यास एक तासाचा विलंब झाला. सभा सुरू होण्यापूर्वी सर्वप्रथम कोट येऊन बसले होते. ते त्यांच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या वामन म्हात्रे यांची वाट पाहत होते. सभापती येताच सभा सुरू झाली. त्यावेळी सभापती व सदस्यांचे उपायुक्त मारुती खोडके यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडीमुळे महापालिकेत शिवसेना व भाजपने फारकत घेतली आहे. त्यात कोट यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे चार सदस्य व एक अपक्ष यांच्यासह पाच सदस्यांनी त्यांची जागा विरोधी सदस्य बसतात, त्या दिशेला ठरविली. मात्र, कोट यांनी वामन म्हात्रे यांना उद्देशून गद्दाराला बाजूला बसवा, असे वक्तव्य केले. त्यावेळी वामन म्हात्रे यांनी महापालिकेत सगळेच गद्दार आहेत, असे बोलून कोट यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन सभापती म्हात्रे यांनी दोघांनाही शांत राहण्याचे आवाहन केले.
पत्रकारांशी बोलताना गणेश कोट म्हणाले की, वामन म्हात्रे यांच्या गैरहजेरीमुळे माझा पराभव झाला. पक्षाने त्यांच्यावर अद्याप कारवाई केली नाही. पक्षाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी पुन्हा मी मागणी केली. वामन म्हात्रे म्हणाले की, मी २५ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. माझी प्रकृती ठीक नसल्याने मी निवडणुकीस गैरहजर राहणार आहे, याची पूर्वकल्पना पक्षाला दिली होती. मी गद्दारी केलेली नाही. याउलट, कोट यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पुन्हा २०१५ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे गद्दार मी का ते, असा सवाल त्यांनी केला.