झेंडा कोणाचा? ६५ टक्के मतदान, काल्हेरमध्ये हाणामारी, मुसईचा बहिष्कार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:58 AM2017-12-14T02:58:54+5:302017-12-14T02:59:19+5:30
जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले.
ठाणे : जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले. भिवंडीतून सर्वाधिक सदस्य निवडून जाणार असल्याने तेथे भाजपाच्या खासदारांना झालेला विरोध, नंतर काल्हेरमध्ये शिवसेना-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झालेली मारामारी, पोलिसांना करावा लागलेला लाठीमार, ठिकठिकाणी होत असलेली बाचाबाची यामुळे ही निवडणूक गाजली. उरलेल्या भागात मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले.
खोणीत काँग्रसेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे, तर दोन गणांत मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने वाटल्याने फेरमतदान घ्यावे लागणार असल्याने शेलार आणि कोलीवली या गणातील मतमोजणी निवडणूक आयोगाने थांबवली आहे. त्यामुळे उरलेले ५२ गट व १०४ गणांचीच मोजणी गुरूवारी होणार आहे.
आजवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपानेही कंबर कसल्याने यावेळची निवडणूक अटीतटीची झाली. श्रमजीवी संघटनेला फोडून भाजपाने शिवसेनेला धक्का दिल्याने आदिवासी मतदार नेमके कोणाला मतदान करतात त्याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. वेगवेगळ््या पक्षातील प्रबळ उमेदवार फोडण्याच्या भाजपाच्या खेळीला प्रत्त्युत्तर देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांना सहकार्य केले. काही ठिकाणी त्यात काँग्रेसही राष्ट्रवादीसोबत आली. या राजकीय समीकरणांतून नेमके काय साध्य होते, त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात ते निकालातून स्पष्ट होईल.